मुंबई BMCचा नवा निर्णय: कुत्रा-बिल्ली पाळणाऱ्यांना वार्षिक कर अनिवार्य, परवाना नसेल तर दंड

1
मुंबई BMCचा नवा निर्णय: कुत्रा-बिल्ली पाळणाऱ्यांना वार्षिक कर अनिवार्य,

मुंबई BMCचा नवा निर्णय: कुत्रा-बिल्ली पाळणाऱ्यांना वार्षिक कर अनिवार्य,

मुंबई BMCने कुत्रा-बिल्ली पालकांसाठी वार्षिक कर आणि लायसन्स अनिवार्य केलं; नियम न पाळल्यास दंडाची कारवाई होणार. संपूर्ण माहिती जाणून घ्या.

सायली मेमाणे

मुंबई २३ जून २०२५ : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आता कुत्रा आणि बिल्ली पाळणं थोडं महाग होणार आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) कुत्रा-बिल्लीसारख्या पाळीव प्राण्यांच्या बाबतीत नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यानुसार पाळीव प्राण्यांसाठी वार्षिक कर भरणं अनिवार्य केलं आहे. शिवाय, पाळीव कुत्रा ठेवण्यासाठी बीएमसीकडून अधिकृत परवाना (लायसन्स) घेणंही बंधनकारक करण्यात आलं आहे.

या नव्या नियमांनुसार, प्रत्येक कुत्र्यासाठी पालकांना बीएमसीकडे अधिकृत परवाना घ्यावा लागणार आहे आणि त्यासाठी दरवर्षी १०० रुपये शुल्क भरावं लागेल. हे केल्यामुळे शहरातील पाळीव प्राण्यांचं अधिकृत नोंदणीकरण होणार असून सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीनेही महत्त्वाचं पाऊल ठरेल, असं मनपाकडून सांगण्यात आलं आहे.

पाळीव प्राण्यांच्या संदर्भातील या मार्गदर्शक सूचना सर्वोच्च न्यायालय आणि भारतीय पशू कल्याण मंडळाच्या निर्देशांनुसार जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये केवळ पाळीव प्राण्यांपुरतंच नव्हे, तर रस्त्यावर राहणाऱ्या भटक्या प्राण्यांनाही खाद्य देणाऱ्यांनाही काही अटी आणि सूचना लागू होणार आहेत.

या नव्या नियमांतर्गत पशू कल्याण संस्था, शिक्षण संस्था, हाउसिंग सोसायट्या अशा विविध घटकांना देखील सहभागी करण्यात आलं आहे. भटक्या प्राण्यांना खाद्य देताना स्थानिक रहिवाशांचा आणि खाद्य देणाऱ्यांचाही सुरक्षिततेचा विचार करण्यात आला आहे.

पाळीव प्राण्यांसाठी परवाना देण्याची प्रक्रिया मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ मधील कलम १९१बी अंतर्गत केली जाणार आहे. कोणतीही व्यक्ती बीएमसीचा परवाना न घेता कुत्रा पाळत असेल तर तो कायद्याच्या दृष्टीने अवैध मानला जाणार आहे.

परवाना घेणाऱ्यांनी बीएमसीने ठरवलेल्या अटींचं पालन करणं आवश्यक असेल. त्याचप्रमाणे, भारतीय पशू कल्याण मंडळाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केलेली अंमलबजावणी देखील करणं अनिवार्य असेल. लायसन्स मिळवताना पालकांनी पाळण्यात असलेल्या कुत्र्यांची संख्या स्पष्टपणे सांगावी लागणार आहे.

हा निर्णय घेतल्यामागे प्रमुख हेतू म्हणजे मुंबई शहरात पाळीव प्राण्यांबाबत शिस्तबद्ध रजिस्ट्रेशन प्रणाली तयार करणं आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी होणारा त्रास कमी करणं आहे. यामुळे भविष्यात पाळीव प्राणी हरवल्यास, त्यांच्या ओळखीचे प्रमाणपत्र आणि रेकॉर्ड मिळवणं सोपं होईल, तसेच प्राण्यांच्या आरोग्यासाठी लसीकरण किंवा अँटी-रेबीज नियंत्रण मोहिमा देखील प्रभावीपणे राबवता येतील.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

About The Author

1 thought on “मुंबई BMCचा नवा निर्णय: कुत्रा-बिल्ली पाळणाऱ्यांना वार्षिक कर अनिवार्य, परवाना नसेल तर दंड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed