ठाण्यातील घोडबंदर रोड एका बाजूने 4 दिवस बंद; वाहतुकीत बदल
ठाण्यातील घोडबंदर रोड एका बाजूने 4 दिवस बंद; वाहतुकीत बदल
8 ते 11 ऑगस्ट दरम्यान घोडबंदर रोडच्या दुरुस्तीमुळे वाहतूक प्रभावित; नीरा केंद्र ते फाऊंटन परिसरात काम, प्रवाशांनी सहकार्य करावे.
सायली मेमाणे
पुणे ८ ऑगस्ट २०२५ : ठाणे आणि मीरा-भाईंदरला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेला घोडबंदर रोड पुढील चार दिवसांसाठी एका बाजूने बंद राहणार आहे. 8, 9, 10 आणि 11 ऑगस्ट या दिवशी नीरा केंद्र ते फाऊंटन या परिसरात रस्ता दुरुस्तीचे काम मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एक अतिरिक्त दिवसही या कामासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
दुरुस्तीच्या काळात एका मार्गिकेवर काम सुरू असताना दुसरी मार्गिका वाहतुकीसाठी खुली राहणार आहे, मात्र यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना 20 ते 40 मिनिटे अतिरिक्त वेळ लागण्याची शक्यता आहे.
या काळात वाहतुकीचे नियोजन ठाणे वाहतूक पोलीस आणि मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस संयुक्तपणे करणार आहेत. अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग पवईच्या दिशेने वळवण्यात आला आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, दोन्ही बाजूंनी एक रुग्णवाहिका आणि क्रेन तैनात राहणार आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आणि चुकीच्या दिशेने वाहन न चालवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.