डॉ. सबनीस : लेखनातून नव्या युगाचा आशावाद, शरद पवारांचा गौरवोद्‌गार

1
डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृतमहोत्सवी गौरव समारंभात शरद पवार यांचे उद्गार

डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृतमहोत्सवी गौरव समारंभात शरद पवार यांचे उद्गार

डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृतमहोत्सवी गौरव समारंभात शरद पवार यांचे उद्गार — लेखनातून शोषितांचे दु:ख आणि नव्या युगाच्या आशांची मांडणी

सायली मेमाणे

पुणे २३ जून २०२५ : “वडिलांकडून लाभलेला सशस्त्र क्रांतीचा वारसा डॉ. श्रीपाल सबनीस लेखनातून समर्थपणे पुढे नेत आहेत. त्यांच्या लेखनात शोषित, पीडित, वंचितांचे दु:ख प्रभावीपणे मांडले जाते आणि त्यात नव्या युगाच्या आशाही दिसतात,” असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे आणि राज्यभरातील ७५ साहित्य‑संस्कृती संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉ. सबनीस यांच्या अमृतमहोत्सवी गौरव समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे होते. या वेळी खासदार ओमराजे निंबाळकर, सभेचे अध्यक्ष सचिन इटकर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, आमदार कैलास पाटील, उद्योजक कृष्णकुमार गोयल, कादंबरीकार विश्वास पाटील, डॉ. सबनीस यांची पत्नी ललिता सबनीस आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “डॉ. सबनीस हे बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून लेखन करतात. त्यांनी सर्वधर्मसमभावाचे तत्त्व जपले आहे. त्यांनी समाजप्रबोधनासाठी लेखनाच्या माध्यमातून मोठे योगदान दिले.”

यावेळी शरद पवार यांनी शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या योगदानाचेही उल्लेख करताना महाराष्ट्राच्या विकासात शिंदे आणि सबनीस यांचे कार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. “सत्ता ही सत्याचे साधन असावी,” असे मत मांडताना डॉ. सबनीस यांनी आजच्या जागतिक राजकारणातील उजव्या झुकावावर चिंता व्यक्त केली. “हिटलरवादी मानसिकतेचा उदय पुन्हा होतोय आणि त्यामुळे मानवतेला धोका निर्माण झाला आहे,” असे त्यांनी नमूद केले.

“मी जात, धर्म, अभिजन‑बहुजन असा भेद मानत नाही. मी माणुसकीचा वारसदार आहे,” असे सांगून त्यांनी भाजप‑काँग्रेस संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. “पहलगाम हल्ल्याच्या वेळी मी पक्षभेद विसरून पंतप्रधानांच्या मदतीला गेलो. आजही माझं कार्य विश्वशांती व मानवतेसाठीच राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी डॉ. सबनीस यांच्या वडिलांनी रझाकारांविरोधात दिलेल्या लढ्याची आठवण करून दिली. चंद्रकांत दळवी व आमदार कैलास पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या.

या समारंभात डॉ. सबनीस लिखित ‘विवेकाची पेरणी आणि राजकारणाचा पंचनामा’ आणि सुनिताराजे पवार संपादित ‘विवेकवादी डॉ. श्रीपाल सबनीस : विचार आणि वारसा’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. विराज तावरे यांनी आभार मानले.

“डॉ. श्रीपाल सबनीस हे केवळ साहित्यिक नाहीत, तर समाजमनाचा आरसा आहेत. त्यांनी प्राध्यापक म्हणून पिढी घडवली, तर लेखक म्हणून अन्यायाला वाचा दिली,” असे शरद पवार यांनी गौरवोद्गारातून सांगितले.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

1 thought on “डॉ. सबनीस : लेखनातून नव्या युगाचा आशावाद, शरद पवारांचा गौरवोद्‌गार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *