डोंबिवलीत चोरट्यांचे थैमान! एका रात्रीत चार दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि संताप
डोंबिवलीत चोरट्यांचे थैमान! एका रात्रीत चार दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि संताप
डोंबिवलीतील छेडा रोड परिसरात एका रात्रीत पूजा साहित्य, झेरॉक्स सेंटर, किराणा दुकान आणि कॉम्प्युटर क्लासेस अशी चार दुकाने फोडण्यात आली. सीसीटीव्हीत कैद झालेल्या फुटेजमुळे चोरट्यांचा चेहरा स्पष्ट दिसला असून वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांनी व्यापारी वर्गात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सायली मेमाणे
४ ऑक्टोबर २०२५ : डोंबिवली परिसर पुन्हा एकदा चोरट्यांच्या धुमाकुळाने हादरला आहे. छेडा रोड भागात एका रात्रीत तब्बल चार दुकाने फोडून चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात चोरी केली. ही संपूर्ण घटना झेरॉक्स सेंटरमधील सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली आहे. फुटेजमध्ये दोन संशयित चोरटे शांतपणे दुकानांचे शटर उघडून आत प्रवेश करताना आणि काही मिनिटांतच माल लंपास करताना दिसत आहेत.
चोरट्यांनी पूजा साहित्य विक्रीचे दुकान, झेरॉक्स सेंटर, किराणा दुकान आणि कॉम्प्युटर क्लासेस या चार दुकानांवर हात साफ केला. घटनास्थळी सकाळी दुकाने उघडण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्यांना शटर उघडलेले आणि आतमधील वस्तू अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेल्या दिसल्या. यानंतर परिसरातील व्यापाऱ्यांनी पोलिसांना तात्काळ कळवले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे.
झेरॉक्स सेंटरच्या मालकाने सांगितले की, “रात्री दुकान बंद करून गेलो होतो. सकाळी आलो तेव्हा शटर तुटलेले दिसले. आतमध्ये रोख रक्कम आणि काही उपकरणे गायब होती. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर दोन तरुण स्पष्ट दिसत आहेत.” या चोरीच्या प्रकाराने परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असून नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.
छेडा रोड परिसरातील व्यापाऱ्यांनी सांगितले की, “अशा घटना महिन्याला एक-दोन वेळा होत आहेत. पोलिसांकडून गस्त वाढवली जाईल असे सांगण्यात येते, मात्र परिस्थितीत काही फरक पडत नाही. रात्री पोलिस गस्त अत्यल्प आहे, त्यामुळे चोरट्यांना संधी मिळते.”
या घटनेनंतर पोलीस उपायुक्तांनी संबंधित भागातील गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून, परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार हे चोरटे व्यावसायिक टोळीतील असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे दिवसभर गस्त वाढवावी, तसेच रात्रीच्या वेळी अधिक गस्त घालावी अशी मागणी केली आहे. व्यापाऱ्यांनी देखील दुकानांबाहेर अतिरिक्त कॅमेरे आणि अलार्म सिस्टीम बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना विनंती केली आहे की, रात्री दुकान बंद करताना सीसीटीव्ही, लॉक आणि अलार्म प्रणाली योग्यरित्या कार्यरत आहेत याची खात्री करावी.
या चोरीच्या घटनेमुळे डोंबिवलीतील व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित झाला असून, पोलिस प्रशासनावर प्रभावी कारवाईसाठी दबाव वाढला आहे.