ड्रामा बंद कर राज ठाकरे! सुशील केडियांच्या मराठी शपथेवर मनसेचा संताप; कार्यालयावर हल्ला
सुशील केडियांच्या मराठी शपथेवर मनसेचा संताप; कार्यालयावर हल्ला
गुंतवणूकदार सुशील केडियांनी मराठी न शिकण्याची शपथ घेतल्यावर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या वरळीतील कार्यालयावर नारळफेक करत हल्ला केला.
सायली मेमाणे
५ जुलै २०२५ : मुंबई शहरात मराठी भाषा वापरावरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. यावेळी वादाच्या केंद्रस्थानी आहेत प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि शेअर बाजार विश्लेषक सुशील केडिया, जे सध्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी मिरारोड येथील एका अमराठी मिठाई विक्रेत्याला केवळ मराठी न बोलल्यामुळे मारहाण केली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर केडिया यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ट्विटरवरून आव्हान दिलं आणि मराठी न शिकण्याची प्रतिज्ञा घेतली.
केडियांनी लिहिलं, “मी ३० वर्षांपासून मुंबईत राहतोय, तरी मला अजूनही मराठी नीटशी येत नाही. मी आता ठामपणे ठरवलंय – मी मराठी शिकणार नाही. तुम्ही काय करायचं ते करा.” या विधानामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आणि याच दरम्यान मनसे कार्यकर्ते त्यांच्या वरळीतील कार्यालयावर पोहोचले.
मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयात प्रवेश करत जोरदार नारळफेक केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त मनसैनिकांनी कार्यालयावर जोरदार आक्रमण केलं. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले आहे. मनसेने या प्रकारावर अजून अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही, मात्र हा प्रकार पक्षाच्या भूमिकेला अनुसरूनच आहे असे मत राजकीय विश्लेषकांनी मांडले आहे.
केडिया कोण आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. ते ‘केडियानॉमिक्स’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या रिसर्च फर्मचे संस्थापक असून, शेअर बाजार, आर्थिक धोरणे, आणि जागतिक गुंतवणूकबाबत त्यांचा व्यापक अनुभव आहे. त्यांना हिंदी, इंग्रजी, बंगाली आणि गुजराती भाषेचे उत्तम ज्ञान आहे. पण मराठी शिकण्याचा त्यांनी ठाम नकार दिल्यामुळे या मुद्द्याला सामाजिक आणि राजकीय वळण लागलं आहे.
मराठी भाषेचा मुद्दा महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या नेहमीच संवेदनशील राहिला आहे. राज ठाकरे आणि मनसे हे पक्ष स्थापनेपासूनच मराठी अस्मितेसाठी लढत असल्याचा दावा करत आले आहेत. अशा पार्श्वभूमीवर केडियांसारख्या प्रसिद्ध व्यक्तीचे विधान मनसेसाठी आव्हानात्मक ठरले आहे. त्यामुळेच त्यांचा तिव्र संताप हल्ल्याच्या रूपाने उफाळून आला, असे स्पष्ट दिसून येते.
या घटनेनंतर राज्यात पुन्हा एकदा मराठी भाषा, अमराठी लोक, आणि भाषिक अस्मिता याबाबतचा राजकीय संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर या घटनेविषयी तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून, अनेकांनी राजकारणाच्या नावाखाली हिंसाचार टाळण्याचे आवाहन केले आहे.
हा वाद केवळ भाषेपुरता न राहता मुंबईतील सामाजिक सलोख्यावर परिणाम करू शकतो, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आगामी काळात मनसेची भूमिका, पोलिस तपास, आणि केडिया यांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.