दिल्लीतील UPSC विद्यार्थ्याचा मृत्यू अपघात नव्हे तर हत्या! फॉरेंसिक विद्यार्थिनीने प्रियकराला पेटवून मारलं

0
दिल्लीतील UPSC विद्यार्थ्याचा मृत्यू अपघात नव्हे तर हत्या! फॉरेंसिक विद्यार्थिनीने प्रियकराला पेटवून मारलं

दिल्लीतील UPSC विद्यार्थ्याचा मृत्यू अपघात नव्हे तर हत्या! फॉरेंसिक विद्यार्थिनीने प्रियकराला पेटवून मारलं

दिल्लीतील गांधी विहार परिसरात UPSC तयारी करणाऱ्या रामकेश मीनाची हत्या फॉरेंसिक सायन्स शिकणाऱ्या अमृता चौहान हिने केली. सुरुवातीला हा गॅस गळतीचा अपघात मानला जात होता, पण सीसीटीव्ही आणि तपासात समोर आली धक्कादायक सत्यकथा.

सायली मेमाणे

पुणे २७ ऑक्टोबर २०२५ : दिल्लीच्या गांधी विहार परिसरात काही आठवड्यांपूर्वी घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. UPSC ची तयारी करणाऱ्या रामकेश मीना या तरुणाचा मृत्यू प्रथमदर्शनी गॅस सिलेंडरच्या स्फोटात झाला, असे समजले जात होते. मात्र, काही दिवसांच्या तपासानंतर या प्रकरणामागे एका तरुणीने रचलेला खूनाचा कट उघड झाला. या खुनाची सूत्रधार कोणीतरी अनोळखी नव्हती, तर फॉरेंसिक सायन्सची विद्यार्थिनी अमृता चौहान निघाली.

६ ऑक्टोबर २०२५ रोजी दिल्ली पोलिसांना गांधी विहार येथील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाने आग विझवली असता आतमध्ये रामकेश मीनाचा पूर्णतः भाजलेला मृतदेह सापडला. सुरुवातीला हा गॅस गळतीमुळे झालेला अपघात असल्याचे मानले गेले. पण घटनास्थळी सापडलेल्या विखुरलेल्या वस्तू, जळालेल्या वस्त्रांचे तुकडे आणि गॅस सिलेंडरची संशयास्पद स्थिती पाहता पोलिसांना काहीतरी वेगळं असल्याचा अंदाज आला.

यानंतर गुन्हे अन्वेषण विभाग आणि एफएसएल टीमने घटनास्थळाचा सखोल तपास सुरू केला. आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांतील फुटेजमध्ये मध्यरात्री दोन लोक इमारतीत प्रवेश करताना दिसले. थोड्याच वेळात त्यापैकी एक बाहेर आला आणि काही मिनिटांनंतर अमृता चौहान नावाची तरुणी तिच्या साथीदारासोबत इमारतीतून बाहेर जाताना दिसली. या फुटेजमुळे पोलिसांचा संशय निश्चित झाला.

अमृता चौहानला १८ ऑक्टोबर रोजी मुरादाबादमधून अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान तिने कबुल केले की, तिने तिच्या माजी प्रियकर सुमित कश्यप आणि त्यांचा मित्र संदीप कुमार यांच्या मदतीने रामकेशची हत्या केली.

अमृता आणि रामकेश लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. रामकेशने तिचे काही खासगी व्हिडिओ आणि फोटो एका हार्ड डिस्कमध्ये सेव्ह केले होते. अमृताने हे व्हिडिओ डिलीट करण्याची मागणी केली असता रामकेशने नकार दिला. या रागातून अमृताने तिच्या माजी प्रियकर सुमितला याची माहिती दिली आणि दोघांनी मिळून हत्येची योजना आखली.

५ ऑक्टोबरच्या रात्री तिघेही गांधी विहार येथे पोहोचले. त्यांनी रामकेशचा गळा आवळून त्याला ठार केलं आणि मृतदेहावर तूप, तेल आणि वाईन टाकून आग लावली. सुमितने गॅस सिलेंडरची नॉब उघडून गॅस पसरवला आणि आग लावली, ज्यामुळे अपघातासारखा स्फोट झाला. अमृताने आतून दरवाजा लॉक केला, जेणेकरून घटना अपघातासारखी भासावी.

१८ ते २३ ऑक्टोबरदरम्यान तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अमृताकडून हार्ड डिस्क, ट्रॉली बॅग आणि मृत व्यक्तीचा शर्ट जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, ही हत्या अत्यंत नियोजनपूर्वक करण्यात आली होती.

या घटनेने दिल्लीसह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधातून उगम पावलेली ही भीषण हत्या समाजात धक्कादायक संदेश देऊन गेली आहे. अपघाताच्या आड दडलेली ही हत्या आता न्यायालयात निर्णायक वळणावर येणार आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *