वाघोली-लोणीकंद परिसरात ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरणारा आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांचा उलगडा
दिवा प्रभागातील बेकायदेशीर इमारतींवर ठाणे महानगरपालिकेची मोठी कारवाई; ८ इमारतींवर तोडक मोहीम सुरू
पुण्यातील वाघोली आणि लोणीकंद परिसरात ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट ६ ने अटक केली आहे. आरोपीकडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला आहे.
सायली मेमाणे
पुणे ३ ऑक्टोबर २०२५ : पुणे: शहरातील वाघोली आणि लोणीकंद परिसरात ट्रान्सफॉर्मर (रोहीत्र) मधील तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने अटक करण्यात यश मिळवले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अंशुमन राम केवल यादव (वय १९, रा. शिरुर बायपास रोड, शिरुर, ता. शिरुर, पुणे) असे आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख रुपयांच्या तांब्याच्या तारांचा मुद्देमाल जप्त केला असून, या कारवाईमुळे एकूण चार वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे आणि त्यांचे पथक नियमित पेट्रोलिंग करत असताना अंमलदार ऋषीकेश ताकवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित यादवला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने वाघोली आणि लोणीकंद भागात आपल्या साथीदारांसह ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीजबाबावरून पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख रुपयांच्या तांब्याच्या तारांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईमुळे वाघोली पोलीस ठाण्यातील दोन, लोणीकंद पोलीस ठाण्यातील एक आणि लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील एक, अशा एकूण चार गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीसाठी वापरण्यात आलेले साहित्य आणि वाहने जप्त केली आहेत. तपासादरम्यान पोलिसांना आणखी काही साथीदारांच्या शोधात असल्याचेही समजते.
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, उप-पोलीस आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम, मदन कांबळे आणि अंमलदार सारंग दळे, बाळासाहेब सकटे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, विनायक साळवे, गिरीष नाणेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, सुहास तांबेकर, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे आणि सोनाली नरवडे यांनी पार पाडली.
पोलिसांच्या या तात्काळ आणि कार्यक्षम कारवाईमुळे परिसरात ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटना रोखण्यास मदत होणार असून, सार्वजनिक वीजपुरवठा सुरक्षित राहील. स्थानिक रहिवाशांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले असून, पुढील काळात अशा चोरीच्या टोळ्यांवर अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.