नवले पुलावर PMPML चे नवे नियम: 30 किमी वेगमर्यादा, प्रवासी सुरक्षेसाठी बसस्टॉप स्थलांतरित
नवले पुलावर PMPML चे नवे नियम: 30 किमी वेगमर्यादा, प्रवासी सुरक्षेसाठी बसस्टॉप स्थलांतरित
नवले पुलावरील भीषण अपघातानंतर PMPML ने 30 किमी वेगमर्यादा लागू केली असून धोकादायक बसस्टॉप स्थलांतरित केला आहे. स्पीडगन तपासणी वाढवून आणि इतर सुरक्षा उपाय बळकट करून अपघात रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सायली मेमाणे
पुणे २१ नोव्हेंबर २०२५ : नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर पुणे शहरात वाहतूक सुरक्षिततेबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. मागील आठवड्यात ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने थेट आठ नागरिकांचा जीवनदीप विझवला आणि या साखळी अपघाताने संपूर्ण राज्याला हादरा दिला. हा परिसर गेल्या काही वर्षांपासून अपघातप्रवण झोन म्हणून ओळखला जात असताना, अखेर PMPML प्रशासनाने निर्णायक पावले उचलत प्रवासी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कडक नियम लागू केले आहेत. PMPML ने कात्रज बोगदा ते चांदणी चौक या धोकादायक उतारावर बसचालकांसाठी प्रतितास 30 किमी ही कमाल वेगमर्यादा निश्चित केली आहे. बसचालकांनी यापुढे या मार्गावर कोणत्याही परिस्थितीत या मर्यादेपेक्षा वेग वाढवू नये, असे आदेश स्पष्टपणे देण्यात आले आहेत.
केवळ वेगमर्यादा कमी करून न थांबता, PMPML ने नवले पूल परिसरातील विद्यमान बस थांबा देखील तात्काळ स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा थांबा महामार्गाच्या मुख्य प्रवाहात असल्याने तो थेट अपघाताचा धोका वाढवत होता. नवीन ठिकाणी हलवण्यात आलेल्या बसस्टॉपमुळे प्रवासी आता मुख्य वाहतूक मार्गापासून दूर सुरक्षित ठिकाणी बसची वाट पाहू शकतील आणि अचानक वाहनांची गर्दी होऊन निर्माण होणारा धोका टाळता येईल. PMPML चालकांना या नवीन नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी विशेष सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे आणि अतिरिक्त प्रशिक्षण देण्यासही सुरुवात झाली आहे.
याआधी शहर प्रशासनाने नवले पुल परिसरातील वाहनांची वेगमर्यादा 60 किमीवरून 30 किमीवर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. या मार्गावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड गन्सची संख्या तीनवरून सहा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. स्पीडगन तपासणीमुळे वेग नियंत्रित राहिल्यास अपघातांची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे. यासोबतच अवजड वाहनांत असणारा अतिरिक्त लोड खेड–शिवापूर टोलनाक्यावर तपासला जाईल. वजन मर्यादेपेक्षा अधिक वजन आढळल्यास तात्काळ दंड आकारला जाणार असून वाहनाचा लोडही कमी करण्यात येईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
रस्त्यावर योग्य दिशादर्शक, चेतावणी फलक आणि रिफ्लेक्टिव्ह साईनची संख्या वाढवण्यावरही भर दिला जात आहे. अपघाताच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना अचूक ठिकाणांची आणि उताराची माहिती मिळावी म्हणून हे उपाय महत्त्वाचे ठरणार आहेत. PMPML ला या परिसरात अधिकृत, सुरक्षित आणि नियोजित बसथांबे उभारण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यंत्रणांनी त्यांच्या हद्दीत असणारी अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, जे सुरक्षित वाहतुकीसाठी अत्यावश्यक आहे.
नवले पुल परिसरात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासन, वाहतूक पोलीस, PMPML आणि रस्ते सुरक्षा विभाग यांच्यातील समन्वय अधिक मजबूत केला जात आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी करणे आणि सुरक्षिततेची हमी देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या सर्व उपाययोजनांमुळे नवले पूल परिसरातील वाहतूक सुसूत्र होईल, अपघातांची शक्यता कमी होईल आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information