नवी मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी मंत्रीपुढे लोटांगण: व्हिडीओ व्हायरल, वर्तनावर टीकेचा भडिमार

0
नवी मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी मंत्रीपुढे लोटांगण: व्हिडीओ व्हायरल, वर्तनावर टीकेचा भडिमार

नवी मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी मंत्रीपुढे लोटांगण: व्हिडीओ व्हायरल, वर्तनावर टीकेचा भडिमार

नवी मुंबई महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांनी सार्वजनिक कार्यक्रमात मंत्री गणेश नाईक यांच्या पाया पडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावर तीव्र टीका होत आहे.

सायली मेमाणे

पुणे १ ऑगस्ट २०२५ : नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांचा एका सार्वजनिक कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक यांच्या पाया पडतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे केवळ नवी मुंबईतच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनावर आणि त्यांच्या राजकीय जवळिकीवर तीव्र चर्चा सुरू झाली आहे. नवी मुंबईच्या वाशी परिसरातील एका कार्यक्रमात हा प्रकार घडला. या कार्यक्रमात मंत्री गणेश नाईक प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकामागून एक त्यांच्या पाया पडण्यास सुरुवात केली. त्या वेळी मंचाजवळ हातात डायरी घेऊन उभे असलेले डॉ. जवादे अचानकपणे पुढे सरसावले आणि त्यांनीही सार्वजनिकरीत्या मंत्रीपदाला वंदन करत लोटांगण घातले. हा प्रकार नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही वेळातच व्हायरल झाला.

या व्हिडीओने शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनाची गंभीर चर्चा निर्माण केली आहे. अनेकांनी विचारले की, एक शासकीय अधिकारी सार्वजनिकरीत्या मंत्रीपदाला नमस्कार करताना इतका खाली कसा झुकू शकतो? एका शासकीय अधिकाऱ्याकडून अपेक्षित असलेली शिस्त, सत्तेपासून अलिप्तता आणि नियमबद्ध वर्तन यांचं हे उल्लंघन नाही का? सरकारी अधिकारी हे लोकसेवक असतात, राजकीय नेत्यांचे सेवक नाहीत, अशी भूमिका अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडली आहे.

या घटनेमुळे काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये घडलेली एक घटना पुन्हा चर्चेत आली आहे. त्या वेळी एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याचा बारमध्ये बसून सरकारी फायलींवर सह्या करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. अशा घटना वारंवार समोर येत असल्यामुळे सरकारमधील शिस्त आणि अधिकाऱ्यांची नीतीमूल्यं यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. विशेषतः सरकारी पदावर असलेला कोणताही व्यक्ती मंत्र्यांसमोर अशा प्रकारे नम्रतेचा आव आणणं हे त्या पदाची मर्यादा ओलांडणं मानलं जात आहे.

हा प्रकार घडल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. अनेकांनी या वर्तनास ‘स्वाभिमानाचा अपमान’ म्हटलं, तर काहींनी थेट प्रशासनाला उद्देशून प्रश्न विचारले की, अशा वागणुकीवर शिस्तभंगाची कारवाई होणार की नाही? काही नागरिकांनी विनोदाच्या स्वरात म्हणलं की, आता पुढे राजकारण्यांसमोर झुकणं ही पदोन्नतीसाठी नवी पात्रता ठरणार का?

सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या पदाचा उपयोग करताना अत्यंत काळजीपूर्वक वागावं लागतं. कोणत्याही राजकीय पक्षाशी जवळिक दाखवणं किंवा सार्वजनिकरीत्या लाचारीचं प्रदर्शन करणं हे केवळ संबंधित अधिकाऱ्यालाच नव्हे तर संपूर्ण शासकीय यंत्रणेला गालबोट लावू शकतं. शासनात काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला लोकांचे हित, शिस्त, आणि न्यायाची भावना ध्यानात घेऊन वागण्याची जबाबदारी असते. राजकीय नेत्यांना आदर देणं गैर नाही, परंतु तो आदर व्यावसायिक सीमारेषा पार करून जर लोटांगण बनला, तर प्रश्न उपस्थित होणारच.

या संपूर्ण घटनेमुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाची प्रतिमा धूसर झाली आहे. डॉ. प्रशांत जवादे हे आरोग्य विभागातील महत्त्वाचे पद भूषवतात आणि अशा वर्तनामुळे त्यांच्यावर तसेच महापालिकेच्या शिस्तीवर लोकांचा विश्वास डळमळीत होतो. सरकारी अधिकारी आणि राजकारणी यांच्यातील सीमारेषा कधीच झाकून ठेवाव्यात, कारण त्या झाकल्या गेल्या नाहीत, तर लोकशाहीतील लोकसेवेचा गाभा नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. आता यावर प्रशासनाची अधिकृत भूमिका काय असते आणि अशा प्रकारांच्या पुनरावृत्तीपासून अधिकारी वर्ग कसा सावरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *