पालघरमध्ये धक्कादायक गुन्हा: चोरीच्या तक्रारीनंतर दुकान पेटवले, आरोपी फरार

पालघरमध्ये धक्कादायक गुन्हा: चोरीच्या तक्रारीनंतर दुकान पेटवले, आरोपी फरार
पालघर जिल्ह्यात चोरीच्या तक्रारीचा सूड घेण्यासाठी दुकानात पुन्हा चोरी करून आग लावण्यात आली. या घटनेमुळे कुटुंब हतबल; आरोपी फरार असून पोलीस तपास सुरु आहे.
सायली मेमाणे
पुणे १ ऑगस्ट २०२५ : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील खानिवली गावामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि धक्कादायक घटना घडली आहे. एका किराणा दुकानात चोरी झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिल्यानंतर आरोपीने केवळ पुन्हा चोरी केली नाही तर दुकान जाळून टाकण्याचा प्रयत्नदेखील केला. आरोपी उमेश सुरेश मुकणे याने आधी पीडित महिलेच्या दुकानात येऊन विनयभंग केला, त्यानंतर रात्री दुकानात घुसून दुसऱ्यांदा चोरी केली आणि नंतर दुकान पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे पहिल्यांदा आग विझवण्यात आली.
त्यानंतर जेव्हा पीडित कुटुंबाने पुन्हा पोलिसांत तक्रार दाखल केली, त्याच रात्री आरोपीने दुसऱ्यांदा दुकानाला आग लावली. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून, पीडित कुटुंब हतबल झाले आहे. “आता आम्ही जगायचं कसं?” असा सवाल या कुटुंबासमोर उभा आहे. ही आपबिती सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते.
या घटनेमुळे खानिवली गावासह संपूर्ण वाडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वाडा पोलीस ठाण्यात आरोपी उमेश सुरेश मुकणे याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात असून तपास सुरू आहे.
ही घटना केवळ गुन्हेगारीचा प्रकार नसून कायद्याचा धसका न घेणाऱ्या प्रवृत्तीचा प्रकार आहे. चोरीसारख्या घटनेची तक्रार दिल्यानंतर सूडबुद्धीने दुकान पेटवण्याचा प्रयत्न हा विकृत मानसिकतेचा परिचय देतो. प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आणि कठोर पावले उचलून गुन्हेगारीला लगाम घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter