पाकिस्तानसाठी गुप्त हेरगिरीप्रकरणी ज्योती मल्होत्रा यांची न्यायालयीन कोठडी २१ जुलैपर्यंत वाढवली

पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरीप्रकरणी ज्योती मल्होत्रा यांची न्यायालयीन कोठडी २१ जुलैपर्यंत वाढवली
पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्रा यांची न्यायालयीन कोठडी हरियाणातील हिसार न्यायालयाने २१ जुलैपर्यंत वाढवली. ‘ट्रॅव्हल विथ जो’ ही यूट्यूब वाहिनी असून तिच्यावर पाकिस्तान दौऱ्याचे व्हिडीओ चर्चेत.
सायली मेमाणे
पुणे ७ जुलै २०२५ : हिसार (हरियाणा) : पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा यांच्या न्यायालयीन कोठडीला १४ दिवसांची वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे त्या आता २१ जुलैपर्यंत तुरुंगात राहणार आहेत. सोमवारी त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिसार न्यायालयात हजर करण्यात आले होते.
ज्योती मल्होत्रा यांना १६ मे रोजी त्यांच्या नव्या अग्रसेन एक्स्टेंशन येथील निवासस्थानावरून हिसार पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांच्या विरोधात अधिकृत गोपनीयता कायदा (Official Secrets Act) आणि भारतीय न्याय संहितेच्या (Bharatiya Nyaya Sanhita – BNS) विविध कलमांतर्गत गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्यांच्यावर पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांशी संबंध असल्याचा संशय असून, तपास यंत्रणांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योतीने नोव्हेंबर २०२३ पासून पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ ‘दानिश’ याच्याशी संपर्क वाढवला होता. दानिशला भारत सरकारने १३ मे रोजी गुप्तहेरगिरीप्रकरणी देशाबाहेर हाकलून लावलं. याच पार्श्वभूमीवर मल्होत्रा यांची अटक करण्यात आली. पोलिसांनी सुरुवातीला ५ दिवसांची कोठडी घेतल्यानंतर पुन्हा ४ दिवसांची वाढ मागितली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं.
मल्होत्रा यांनी ‘ट्रॅव्हल विथ जो’ या यूट्यूब चॅनेलवर पाकिस्तानमधून केलेले व्ह्लॉग्स शेअर केले आहेत. त्या तीन वेळा पाकिस्तान दौऱ्यावर गेल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्या दरम्यान त्यांनी लाहोरसारख्या ठिकाणी केलेल्या शूटिंगचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, या व्हिडिओंमध्ये त्या सुरक्षारक्षकांच्या संरक्षणाखाली फिरताना दिसतात, जे सामान्य पर्यटकांना मिळत नाही. वाहतूक रोखण्यात आल्याचे दृश्य, सरकारी यंत्रणांची सोय यामुळे संशय अधिक गडद झाला आहे.
या सर्व घडामोडी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर घडल्याने याला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. या ऑपरेशनद्वारे भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर लक्ष्य केले होते. त्यानंतर मल्होत्रा यांची अटक राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
पोलिसांच्या मते, मल्होत्रा यांचे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी वाढते संबंध देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोका ठरू शकतात. यामुळे या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून डिजिटल पुरावे, संभाषणे आणि व्हिडिओंची बारकाईने चौकशी केली जात आहे.
प्रकरण गाजत असतानाच देशभरातून यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वांची गरज व्यक्त केली जात आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter