पिंपरी-चिंचवडमध्ये मतांसाठी अर्ध्या दरात टीव्ही–फ्रिज! प्रभाग २३ मधील प्रलोभन प्रकरणावर चर्चा
पिंपरी-चिंचवडमध्ये मतांसाठी अर्ध्या दरात टीव्ही–फ्रिज! प्रभाग २३ मधील प्रलोभन प्रकरणावर चर्चा
PCMC निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी 50% सवलतीत टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन व सायकलींचे वाटप. भाजप तिकीट इच्छुक कांचन जावळे यांचा प्रचाराचा नवा फंडा चर्चेत.
सायली मेमाणे
पुणे १७ नोव्हेंबर २०२५ : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका जवळ येत असताना विविध राजकीय इच्छुकांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या शक्कली लढवल्या जात आहेत. मतदारांची मर्जी मिळवण्यासाठी काहीजण सार्वजनिक कामांवर भर देत असताना काहीजण थेट आकर्षक प्रलोभने देऊन मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रभाग क्रमांक 23 मधील भाजप तिकीट इच्छुक कांचन अमोल जावळे यांचा असा एक उपक्रम सध्या मोठ्या चर्चेत आहे.
कांचन जावळे यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरळ 50 टक्के सवलतीत घरगुती वस्तू देण्याचा उपक्रम सुरू केला असून, यात टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मुलांच्या सायकली, पिठाची गिरणी यांसारख्या महागड्या वस्तूंचाही समावेश आहे. वाढत्या महागाईच्या काळात या वस्तू अर्ध्या दरात मिळत असल्याने नागरिकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसत आहे. अनेक जण प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन बुकिंग करत आहेत आणि वस्तू घेण्यासाठी रांगा लागत असल्याचेही दृश्य दिसत आहे.
या उपक्रमाबाबत कांचन जावळे यांचे पती अमोल जावळे यांनी सांगितले की, “लोकांना स्वस्तात चांगल्या वस्तू मिळत असल्याने प्रतिसाद प्रचंड आहे. आतापर्यंत 200 हून अधिक लोकांनी बुकिंग केले आहे. रोज शंभरच्या आसपास मुलांच्या सायकली विकल्या जात आहेत. महागाईच्या काळात लोकांना यातून खूप मदत होते आहे.” त्यांच्या मते हा उपक्रम सामाजिक सेवा म्हणून राबवला जात आहे आणि मतदारांना आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.
मात्र राजकीय वर्तुळात हा मुद्दा वेगळ्या दिशेने चर्चिला जात आहे. निवडणूक तिकीट मिळवण्यासाठी मतदारांना अशा स्वरूपाची प्रलोभने देणे योग्य आहे का, यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणुकीपूर्वी मतदारांना स्वस्त वस्तूंचे वितरण हा मतप्रभाव करण्याचा प्रयत्न असल्याचे काही राजकीय जाणकारांचे मत आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या महानगरपालिकेत निवडणूक स्पर्धा तीव्र असते, त्यामुळे प्रत्येक इच्छुक स्वतःची ओळख मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
कांचन जावळे यांना भाजपचे तिकीट मिळेल का, याबाबतही चर्चा वाढली आहे. अमोल जावळे यांनी सांगितले की, “आमदार शंकरभाऊ जगताप यांनी आम्हाला शब्द दिला आहे — काम करत राहा, तिकीट मिळेल. आमच्या कामाच्या बळावर आम्हाला भाजपचे तिकीट मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.” यामुळे प्रभाग क्रमांक 23 मध्ये भाजप इच्छुकांमध्ये नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.
या प्रकारामुळे निवडणूक आयोगाकडून कोणतीही कारवाई किंवा चौकशी होणार का, याचीही चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकांदरम्यान मतदारांना आर्थिक किंवा वस्तुरूप लाभ देणे हा आचारसंहितेचा गंभीर भंग मानला जातो. सध्या महापालिका निवडणुका जाहीर नसल्या तरी राजकीय वातावरण तापत असल्याने अशा उपक्रमांकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
कुल मिलाकर, प्रभाग क्रमांक 23 मध्ये हा 50% सवलतीचा “ऑफर उपक्रम” मतदारांत चर्चेचा विषय ठरला आहे. काही नागरिकांना स्वस्त वस्तू मिळत असल्यामुळे आनंद आहे, तर काहीजण या पद्धतीवर प्रश्न विचारत आहेत. महापालिका निवडणुका जवळ येत असताना पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात हा मुद्दा पुढील काही दिवस तापण्याची शक्यता आहे.