पिंपरी-चिंचवडमध्ये २३ कोटींच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर सहा महिन्यातच भेगा
पिंपरी-चिंचवडमध्ये २३ कोटींच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर सहा महिन्यातच पडल्या भेगा
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २३ कोटींच्या रस्त्यावर सहा महिन्यांतच भेगा; दर्जावर गंभीर प्रश्न, नागरिकांची चौकशीची मागणी
सायली मेमाणे
पुणे 31 जुलै २०२५ : पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक ते शंकरवाडी या मार्गावर अवघ्या सहा महिन्यांपूर्वी २३ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर गंभीर भेगा पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या दर्जाहीन कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून स्थानिक नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. या रस्त्याचा उद्देश पिंपळे गुरव, कासारवाडी, शंकरवाडी मार्गे पुणे-मुंबई महामार्गावर जलद प्रवास शक्य व्हावा असा होता. पण वापरास सुरुवात होताच या रस्त्याने निकृष्ट बांधकामाचे वास्तव दाखवून दिले आहे.
शंकर मंदिर ते भारतरत्न जे. आर. डी. टाटा उड्डाणपूल, कासारवाडी दरम्यानच्या प्रमुख रस्त्याला भेगा पडल्याचे दिसून आले आहे. शंकरवाडीतील घनकचरा ट्रान्स्फर स्टेशनजवळ अवघ्या काही दिवसांतच १० मीटर लांब आणि २ इंच रुंद अशी पहिली भेग पडली होती. यानंतर तातडीने डागडुजी करण्यात आली आणि त्या भागातील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली. मात्र डागडुजीनंतर अवघ्या एका महिन्याच्या आतच १० ते १५ मीटर लांब आणि १ ते १.५ इंच रुंद अशी दुसरी भेग त्याच ठिकाणी निर्माण झाली. पुन्हा एकदा डागडुजी करून ताज्या काँक्रीटचा वापर करण्यात आला.
या प्रकरणाबाबत PCMC चे सहाय्यक अभियंता सुनील डांगडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ठेकेदाराला पाच वर्षांची देखभाल करारानुसार करावी लागते आणि त्यानुसार त्यांनी आवश्यक ती दुरुस्ती केली आहे. मात्र केवळ दुरुस्तीने प्रश्न सुटणार नसून सुरुवातीपासूनच कामाची गुणवत्ता तपासली गेली असती तर असा प्रकार घडला नसता, असे अनेक नागरी संस्थांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.
या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोपही होत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. मात्र, या निधीचा योग्य उपयोग न झाल्यास आणि कामांची गुणवत्ता तपासली गेली नाही तर अशा समस्यांचा सामना वारंवार करावा लागेल.
या रस्त्यावर भेगा का पडल्या? बांधकाम करताना कोणती चूक झाली? सिमेंट काँक्रीटसारख्या मजबूत रस्त्यावर इतक्या लवकर भेगा का पडतात? यासारख्या प्रश्नांची उत्तरं प्रशासनाने दिली पाहिजेत. तसेच या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.
लोकांच्या पैशातून उभारलेली पायाभूत सुविधा इतक्या कमी कालावधीत खराब होणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहून भविष्यातील प्रकल्पांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि जबाबदारी याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.