पीएमपीएमएलमध्ये करार पद्धतीने नियुक्त दोन मार्केटिंग एक्झिक्युटिव्हवर निष्काळजीपणा व सॉफ्टवेअर गैरवापर प्रकरणी गुन्हा दाखल
पीएमपीएमएलमध्ये करार पद्धतीने नियुक्त दोन मार्केटिंग एक्झिक्युटिव्हवर निष्काळजीपणा व सॉफ्टवेअर गैरवापर प्रकरणी गुन्हा दाखल
पीएमपीएमएलच्या सॉफ्टवेअर व अधिकृत डेटाचा गैरवापर, प्रवाशांची गैरसोय आणि उत्पन्नात घट—या गंभीर आरोपांवरून स्वारगेट पोलीस ठाण्यात दोन करार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल.
सायली मेमाणे
११ नोव्हेंबर २०२५ : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) मध्ये करार पद्धतीने मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांवर कामकाजातील निष्काळजीपणा, दिशाभूल आणि सॉफ्टवेअर संदर्भातील गंभीर गैरवापर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. श्री. राजन मधुकर लिंगायत (रा. धनकवडी, पुणे) आणि श्री. गौरव कुलकर्णी (रा. कोथरुड, पुणे) या दोघांविरुद्ध महामंडळाचे विधी अधिकारी ज्ञानोबा जाधव यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार एफआयआर (क्रमांक 317/2025) दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही कर्मचाऱ्यांना पीएमपीएमएलकडून एफएल, पेयु डॅशबोर्ड, मोबाईल अॅप, रेव्हेन्यू पासवर्ड तसेच सॉफ्टवेअरशी संबंधित संवेदनशील जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या. मात्र ऑगस्ट ते सप्टेंबर 2025 या काळात सुरू करण्यात आलेली QR कोड तिकीट प्रणाली व्यवस्थित न चालल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली तसेच पीएमपीएमएलच्या उत्पन्नात थेट घट झाली. QR प्रणालीतील अडथळे, रेव्हेन्यू मॉनिटरिंगमधील त्रुटी आणि तांत्रिक अडचणी याबाबत तक्रारी वाढत असताना या दोघांनी जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडल्या नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. याच कारणांमुळे पीएमपीएमएलकडून त्यांचा करार काही दिवसांपूर्वीच रद्द करण्यात आला होता आणि त्यांना सेवेतून कमी केले होते.
महामंडळाने केलेल्या तपासात आणखी धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. दोघांकडे असलेले अधिकृत सॉफ्टवेअर डाटा, पासवर्ड आणि प्रवेशाधिकारांचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले. तसेच पीएमपीएमएलच्या अधिकृत ई-मेल आयडी आणि वेबसाईटचा अनधिकृतपणे वापर करून संवेदनशील माहितीचा प्रवेश घेतल्याचा आरोप आहे. केवळ सॉफ्टवेअर गैरवापरच नव्हे तर त्यांना सोपविण्यात आलेले लॅपटॉप, डेस्कटॉप, टर्मिनल उपकरणे आणि इतर कामाचे साहित्यही परत न केल्याचे आढळले. या सर्व प्रकारामुळे केवळ संस्थेच्या डेटासुरक्षेलाच धोका निर्माण झालेला नाही तर प्रवाशांच्या सेवा व्यवस्थेलाही बाधा पोहोचली आहे.
पीएमपीएमएलचे म्हणणे आहे की या प्रकारामुळे प्रवासी सेवा, डिजिटल तिकीट प्रणाली, महसूल नियंत्रण आणि सुरक्षा प्रक्रिया धोक्यात आल्या. संस्थेच्या सॉफ्टवेअर डेटाचा चुकीचा वापर होऊन आर्थिक नुकसान, तांत्रिक अडचणी आणि प्रशासनातील प्रक्रियांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन संस्थेच्या विधी अधिकाऱ्यांनी तत्काळ तक्रार दाखल केली.
या गंभीर प्रकरणात भारतीय न्यायसंहिता कलम 3143(5) आणि 69 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास स्वारगेट पोलीस ठाणे करत आहे. भविष्यकाळात डिजिटल प्रणालीशी संबंधित जबाबदाऱ्या अत्यंत काळजीपूर्वक आणि सुरक्षिततेच्या उच्च मानकांनुसार हाताळाव्या लागतील, असे पीएमपीएमएलने स्पष्ट केले आहे.
या घटनेने पीएमपीएमएलच्या डिजिटल कार्यप्रणालीतील सुरक्षाविषयक मुद्दे आणि करार पद्धतीतील जबाबदाऱ्यांची व्यावसायिकता यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रवाशांच्या सेवेशी संबंधीत व्यवस्थापन अधिक पारदर्शक, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि सुरक्षित असणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.