पुणे ग्रँड चॅलेंज टूरसाठी सज्ज प्रशासन; जागतिक दर्जाच्या तयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश
पुणे ग्रँड चॅलेंज टूरसाठी सज्ज प्रशासन; जागतिक दर्जाच्या तयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश
पुणे ग्रँड चॅलेंज टूरच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पायाभूत सुविधा, वाहतूक, सुरक्षा आणि समन्वयाबाबत सर्व विभागांना जागतिक दर्जाच्या तयारीचे निर्देश दिले आहेत.
पुणे १९ डिसेंबर २०२५ : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेणाऱ्या पुणे ग्रँड चॅलेंज टूरच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक बाब अत्यंत दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण व्हावी, यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विशेष भर दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत त्यांनी सर्व संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देत, कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला.
जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, पुणे ग्रँड चॅलेंज टूरमुळे भारताची प्रतिमा जागतिक क्रीडा क्षेत्रात अधिक भक्कम होणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ एक स्पर्धा नसून, भारताची आयोजन क्षमता आणि पायाभूत सुविधा जगासमोर मांडण्याची संधी आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागांमध्ये परिपूर्ण समन्वय असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भारतकुमार बाविस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुणे शहर वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव, पिंपरी-चिंचवड वाहतूक उपायुक्त विवेक पाटील, पुणे ग्रामीण पोलीस उपअधीक्षक दिलीप शिंदे तसेच पुणे ग्रँड चॅलेंज टूरचे तांत्रिक संचालक पिनाकी बैसाक यांच्यासह विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेच्या मार्गावरील सर्व रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावेत, असे निर्देश देताना जिल्हाधिकाऱ्यांनी लेन मार्किंग, स्पष्ट दिशादर्शक फलक, रस्त्यांची मजबुती आणि टिकाऊपणा याकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले. तसेच मार्ग सुशोभीकरण, अतिक्रमण हटवणे आणि आवश्यक ठिकाणी पोलीस मदतीने कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले.
या स्पर्धेचा प्रचार आणि जनसहभाग वाढवण्यासाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमपीएमएल, मेट्रो स्थानके आणि बस डेपो येथे ठळक ठिकाणी ब्रँडिंग व प्रचार साहित्य लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. यामुळे नागरिकांमध्ये स्पर्धेबाबत उत्सुकता आणि सहभाग वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सुरक्षेच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस यांनी संयुक्तपणे वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षा तैनातीचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण पोलिसांना सायकलवरून प्रत्यक्ष मार्गाची पाहणी करून जमिनीवरील परिस्थिती तपासण्यास सांगण्यात आले आहे.
स्पर्धेपूर्वी प्रशिक्षित मनुष्यबळ, वाहने, बॅरिकेड्स आणि इतर साधनसामग्रीची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्याचे आदेश देण्यात आले असून, अंतिम क्षणी कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून पूर्ण क्षमतेने रंगीत तालीम घेण्यावरही भर देण्यात आला आहे. बैठकीदरम्यान विविध विभागांनी पायाभूत सुविधा, सुरक्षा, लॉजिस्टिक्स आणि समन्वयाशी संबंधित सुरू असलेल्या कामांचा सविस्तर अहवाल सादर केला. प्रशासनाच्या या तयारीमुळे पुणे ग्रँड चॅलेंज टूर जागतिक दर्जाची ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information