पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; संतप्त ग्रामस्थांची मागणी – “बिबट्या दिसला की गोळी घालू द्या!”
पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; संतप्त ग्रामस्थांची मागणी – “बिबट्या दिसला की गोळी घालू द्या!”
पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा उपद्रव वाढल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. नसबंदीऐवजी थेट गोळी घालण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सायली मेमाणे
पुणे २७ ऑक्टोबर २०२५ : पुणे | पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, मंचर, नारायणगाव आणि शिरूर या भागांमध्ये बिबट्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी नव्या चिंतेचं कारण बनला आहे. दररोज होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी, महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागरिकांनी अनेक वेळा वन विभागाकडे तक्रारी करूनही ठोस उपाय न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आता थेट उपाय सुचवला आहे — “बिबट्या दिसला की गोळी घालण्याची परवानगी द्या!”
अलीकडच्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागात बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. शेतात काम करताना, जनावरांना चारताना आणि अगदी घराजवळदेखील बिबटे दिसत आहेत. या घटनांमुळे लोकांच्या मनात तीव्र भीती निर्माण झाली आहे. काही गावांत बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये जनावरे ठार झाल्याच्या तक्रारीही वारंवार समोर येत आहेत.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन बिबट्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा केली. पिंजऱ्यांची संख्या वाढवणे, नसबंदी मोहिमा आणि रेस्क्यू सेंटर्स उभारणे या उपायांची अंमलबजावणी सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र ग्रामस्थांच्या मते, हे उपाय अपुरे ठरत आहेत.
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी यावर कठोर भूमिका घेत सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “ज्या प्रमाणात मानवी जीवित धोक्यात येत आहे, त्या पार्श्वभूमीवर आता सरकारने बिबट्यांना गोळ्या घालण्याची परवानगी द्यावी. जसा घरात चोर शिरल्यास स्वतःचे रक्षण करण्यासाठी गोळी झाडता येते, तसाच हक्क नागरिकांना इथे मिळायला हवा.”
वन विभागाने आतापर्यंत ३ बिबट्यांना पकडून सुरक्षितपणे स्थलांतरित केले आहे. तरीही हल्ल्यांमध्ये घट झालेली नाही. नागरिकांनी अनेक ठिकाणी निदर्शने करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. वन अधिकाऱ्यांना कायदेशीर मर्यादांमुळे थेट शिकार करता येत नाही, त्यामुळे गावकऱ्यांचा राग अधिक वाढला आहे.
सध्या ग्रामीण भागात रात्रपाळीच्या वेळी शेतकऱ्यांनी एकत्रित गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी ग्रामपंचायतींनी स्वखर्चाने सायरन आणि सौरदिवे बसवले आहेत. तरीही नागरिकांचे म्हणणे आहे की, “फक्त पिंजरे आणि नसबंदी उपाय पुरेसे नाहीत. जोपर्यंत थेट कारवाई केली जात नाही, तोपर्यंत सुरक्षितता मिळणे अशक्य आहे.”
बिबट्यांचा प्रश्न केवळ पुण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारच्या तक्रारी समोर येत आहेत. पर्यावरण संरक्षण आणि मानवी सुरक्षेचा समतोल राखत योग्य तो निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे, असे नागरिक आणि तज्ज्ञ दोघेही मान्य करत आहेत.