पुणे: जुन्नरमध्ये तलाठी व कॉलेज तरुणीने केली एकत्र आत्महत्या; १२०० फूट खोल दरीत सापडले मृतदेह
जुन्नरमध्ये तलाठी व कॉलेज तरुणीने केली एकत्र आत्महत्या
पुणे : श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र पारधी आणि कॉलेज तरुणी रूपाली खुटाण यांचा मृतदेह 1200 फूट खोल दरीत आढळला. सुसाइड नोटमध्ये कौटुंबिक त्रासाला कारणीभूत ठरवत एकत्र आत्महत्या केल्याचा संशय. पोलिस तपास सुरू.
सायली मेमाणे
जुन्नर, पुणे २४ जून २०२५ : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कोकणकडा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र पारधी आणि पुण्यातील महाविद्यालयीन तरुणी रूपाली खुटाण यांचे मृतदेह कोकणकड्याजवळील १२०० फूट खोल दरीत आढळून आले. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात मोठी चर्चा सुरु झाली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात दोघांनी आत्महत्या केल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. घटनास्थळी दोघांनी लिहिलेल्या स्वतंत्र सुसाइड नोट्स सापडल्या असून त्यामध्ये कौटुंबिक त्रास व मानसिक तणावाचे स्पष्ट उल्लेख आहेत.
रामचंद्र पारधी (मूळगाव दुर्गावाडी, कार्यरत तलाठी, श्रीगोंदा) यांच्या पत्नीने त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली होती. तर दुसरीकडे, रूपाली खुटाण (जुन्नर) ही तरुणी देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती आणि तिच्या अपहरणाची तक्रार जुन्नर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली होती.
जुन्नरच्या रिव्हर्स वॉटरफॉल परिसरात स्थानिकांनी पांढऱ्या रंगाची कार उभी असल्याची माहिती दिल्यानंतर पोलिस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. शोधादरम्यान कड्याच्या टोकावर पुरुष व स्त्रीच्या चपला आढळून आल्या. रेस्क्यू टीमने दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर दोघांचे मृतदेह दरीतून बाहेर काढले.
सुसाइड नोटमधून गंभीर आरोप
रामचंद्र पारधी यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये, “पत्नी व तिच्या नातेवाईकांनी मानसिक त्रास दिला आहे,” असा स्पष्ट उल्लेख केला आहे. तसेच, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर, रूपाली खुटाणने तिच्या पालकांकडून होणाऱ्या तणावामुळे आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे.
पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, दोन्ही चिठ्ठ्यांच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. ही आत्महत्या नसून अन्य कोणतीही पार्श्वभूमी आहे का, याचा तपास सखोलपणे केला जात आहे.
Do‑follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz