पुणे देशात दुसऱ्या स्थानी! राष्ट्रीय पुस्तक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
पुणे देशात दुसऱ्या स्थानी! राष्ट्रीय पुस्तक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे देशात दुसऱ्या स्थानी! राष्ट्रीय पुस्तक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला देशात दुसऱ्या क्रमांकाचा प्रतिसाद; वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी पुरस्कार, फिरती पुस्तक बस, आणि हजारो विनामूल्य ई-पुस्तकांची सुविधा.

सायली मेमाणे

पुणे ८ जुलै २०२५ : राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT) तर्फे देशभरात आयोजित होणाऱ्या पुस्तक महोत्सवांमध्ये पुण्याला देशात दुसरे स्थान मिळाले आहे. दिल्लीच्या खालोखाल पुणे शहराला पुस्तकप्रेमींचा सर्वाधिक प्रतिसाद मिळतो, अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक यांनी दिली. ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १३ ते २१ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या अनुषंगाने पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे आणि प्रसेनजीत फडणवीस हे उपस्थित होते.

युवराज मलिक यांनी सांगितले की, आगामी पुस्तक महोत्सवाची संकल्पना ‘जॉय ऑफ रीडिंग’ म्हणजेच वाचनाचा आनंद अशी असणार आहे. वाचन संस्कृतीला चालना देणारे उत्कृष्ट छायाचित्रण, रिपोर्टिंग आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी विशेष पुरस्कार योजना देखील असणार आहे.

तीन हजार पुस्तके विनामूल्य डाऊनलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. याचबरोबर फिरत्या पुस्तक बसच्या माध्यमातून महोत्सवात सहभागी होता न आलेल्या गावांपर्यंतही वाचन संस्कृती पोहचवण्याचा प्रयत्न होणार आहे. या महोत्सवात केवळ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असणार नाहीत, तर विविध चर्चासत्रे, कार्यशाळा, आणि लेखक-संवाद अशा उपक्रमांद्वारे वाचकांना सशक्त साहित्यिक अनुभव मिळणार आहे.

मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर याठिकाणीदेखील लवकरच पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे युवराज मलिक यांनी स्पष्ट केले. सुरुवातीला मोठ्या शहरांमध्ये आणि नंतर टप्प्याटप्प्याने ग्रामीण भागातदेखील वाचन चळवळीला गती देण्याचा उद्देश आहे. पुण्याच्या वाचन संस्कृतीला मिळणारा प्रतिसाद ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून, अशा महोत्सवांद्वारे नव्या पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण होणार आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed