पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये हवा बिघडली; वाकड, हिंजवडी भागात सर्वाधिक प्रदूषण
पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये हवा बिघडली; वाकड, हिंजवडी भागात सर्वाधिक प्रदूषण
पिंपरी-चिंचवडमध्ये दिवाळीपूर्वीच हवा अतिखराब झाली. वाकड, हिंजवडी, भोसरी आणि निगडी परिसरात AQI खूप वाढले; बांधकाम, मेट्रो काम आणि फटाके प्रदूषणाचे मुख्य कारण.
सायली मेमाणे
पुणे २४ ऑक्टोबर २०२५ : पिंपरी-चिंचवड – पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वायुप्रदूषणाची पातळी वाढल्यामुळे हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली आहे. खास करून वाकड, हिंजवडी, भोसरी आणि निगडीसारख्या भागांमध्ये घरगुती व औद्योगिक प्रकल्पांमुळे धूलिकणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. दिवाळीत होणाऱ्या फटाक्यांच्या आतिषबाजीने हवेची गुणवत्ता आणखी खालावली आहे. अशुद्ध हवामानामुळे पिंपरी-चिंचवड आता महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक ठरले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दिवाळी सुरू होण्यापूर्वीच वाकड परिसरातील भूमकर चौकात AQI ३१५ पर्यंत पोहोचला होता, जो अतिखराब दर्जा मानला जातो. भोसरीत AQI ३४२, निगडी ३४१ आणि भूमकर चौकात ३१३ नोंदवण्यात आले. हिंजवडी इन्फोटेक पार्क परिसरातही AQI १९६ इतका उच्च नोंदवला गेला आहे.
चोविसावाडी आणि मोशी येथील रहिवासी भागात क्रशर प्लांट चालू असल्याने परिसरात धूळ आणि ध्वनिप्रदूषण वाढले आहे. नागरिकांना घरात आणि वाहनांवर धुळीचा थर साचल्याचा त्रास होत असून, हवेच्या खराब गुणवत्तेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, रविवारी दुपारी ४ वाजता भूमकर चौकात AQI ३०५ वर पोहोचला, तर शिवाजीनगरमधील म्हाडा कॉलनीत AQI २४४ नोंदवला गेला. पाषाण (१२१), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (११६) आणि निगडी (१०८) येथे हवा ‘मध्यम’ दर्जाची होती, तर हडपसर (८८) येथे समाधानकारक दर्जा नोंदवला गेला.
हिंजवडी परिसरात सुरू असलेली बांधकामे, आर एम सी प्लांट्स आणि वाहतुकीमुळे धूळ प्रदूषण वाढत आहे. याशिवाय, दिवाळीतील फटाक्यांमुळे ही गुणवत्ता आणखी खालावली आहे. स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने उपाययोजना करून प्रदूषण कमी करण्याचे आवाहन केले आहे.
पालिकेच्या अहवालानुसार, वाढती वाहने, औद्योगिकीकरण आणि बांधकामामुळे हवेची गुणवत्ता खालावली असून, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक जागांमध्ये धूळ कमी करण्यासाठी नियमित स्वच्छता, गाळे आणि वाहनांची नियमित तपासणी आवश्यक आहे. नागरिकांनी मास्क वापरणे आणि घरात हवेची गुणवत्ता टिकवण्यासाठी सावधानता घेणे आवश्यक आहे.