पुणे राजकारणात राडा: बॅनर वादातून भाजप नगरसेविकेच्या भावावर हल्ला, ॲट्रॉसिटीची तक्रार
पुणे राजकारणात राडा: बॅनर वादातून भाजप नगरसेविकेच्या भावावर हल्ला, ॲट्रॉसिटीची तक्रार
पुण्यात बॅनर लावण्याच्या वादातून भाजप नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. नगरसेविकेच्या भावावर हल्ला, ॲट्रॉसिटी अंतर्गत तक्रार, खडक पोलिसांत गुन्हे दाखल.
पुणे 2५ जानेवारी २०२६ : पुणे शहरात स्थानिक राजकारण तापत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. निवडणुकीत यश मिळाल्यानंतर अवघ्याच काही दिवसांत भाजपच्या नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, बॅनर लावण्याच्या किरकोळ कारणावरून थेट मारहाणीपर्यंत प्रकरण गेले आहे. या घटनेत एका नगरसेविकेच्या भावावर टोळक्याने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला असून, यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहिया नगर आणि काशेवाडी परिसरात बॅनर लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. हे दोन्ही गट एकाच प्रभागातून निवडून आलेल्या दोन भाजप नगरसेविकांचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, मात्र काही वेळातच हा वाद हिंसक वळणावर गेला. एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला करत बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
या घटनेत भाजप नगरसेविका मृणाल कांबळे यांचे भाऊ शंतनू कांबळे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर टोळक्याने हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शंतनू कांबळे यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, हल्ला करणारे भाजप नगरसेविका अर्चना पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे 14 ते 15 जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून, बापू कांबळे यांनी तुषार पाटील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. माझी मुलगी मागासवर्गीय असून तिला तुषार पाटील सातत्याने त्रास देत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भातही खडक पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.
या हाणामारीनंतर खडक पोलीस स्टेशन परिसरात मोठ्या संख्येने समाजातील नागरिक जमले होते. घटनेमुळे समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप बापू कांबळे यांनी केला. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. दोन्ही बाजूंकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचा स्वतंत्रपणे तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, या प्रकरणात तुषार पाटील यांनी सार्वजनिकपणे माफी मागितली आहे. समाजातील लोकांच्या भावना दुखावल्याची कबुली देत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. यानंतर बापू कांबळे यांनीही आम्ही हा विषय इथेच सोडून देत असल्याचे सांगितले आहे. मात्र, कायदेशीर प्रक्रिया सुरूच राहणार असून पुढील कारवाई तपासाअंती केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
निवडणुकीनंतर बॅनर आणि फ्लेक्स लावण्यावरून होणारे वाद किती गंभीर रूप धारण करू शकतात, याचे हे ताजे उदाहरण मानले जात आहे. राजकीय वर्चस्वाच्या स्पर्धेतून निर्माण होणाऱ्या अशा घटना शहरातील शांतता आणि सामाजिक सलोख्यासाठी धोकादायक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information