पुणे: वरिष्ठ लेखापालाच्या आत्महत्येनंतर अमित कल्याणी यांच्याविरोधात चौकशीचे आदेश

वरिष्ठ लेखापालाच्या आत्महत्येनंतर अमित कल्याणी यांच्याविरोधात चौकशीचे आदेश
कल्याणी टेक्नोफोर्ज लिमिटेडमधील वरिष्ठ लेखापाल नीलेश गायकवाड यांच्या आत्महत्येप्रकरणी अमित कल्याणी यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिले आहेत.
सायली मेमाणे
पुणे ३१ जुलै २०२५ : पुणे जिल्ह्यातील एका धक्कादायक प्रकरणात न्यायालयाने ‘भारत फोर्ज’चे उपाध्यक्ष आणि सह व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात नव्याने चौकशीचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण 20 ऑगस्ट 2017 रोजी घडले असून, कल्याणी समूहातील ‘कल्याणी टेक्नोफोर्ज लिमिटेड’ या कंपनीत वरिष्ठ लेखापाल म्हणून कार्यरत असलेले नीलेश अशोक गायकवाड (वय 32, रा. कोंढवा) यांनी चाकणमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती.
नीलेश गायकवाड यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी थेट अमित कल्याणी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या चिठ्ठीत त्यांनी आपल्यावर झालेल्या मानसिक त्रासाचा उल्लेख केला होता आणि हे सर्व कंपनीतील व्यवस्थापनामुळे झाल्याचा ठपका ठेवला होता. त्यामुळे हे प्रकरण केवळ वैयक्तिक नसून कंपनीतील कामकाजाच्या वातावरणाशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेनंतर गायकवाड यांचा भाऊ यांनी चाकण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, याप्रकरणात काही काळानंतर प्रगती झाली नव्हती. त्यामुळे तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यानंतर खेड-राजगुरुनगर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी या प्रकरणात नव्याने चौकशी करण्याचे आदेश चाकण पोलिसांना दिले आहेत.

गायकवाड यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये स्पष्टपणे उल्लेख केला होता की, कंपनीतील वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करताना त्यांच्यावर सातत्याने मानसिक दडपण आणले जात होते. अनेक वेळा चुकीच्या कामांसाठी जबाबदार धरणे, कामाच्या वेळा वाढवणे आणि अपमानास्पद वागणूक देणे, यामुळेच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले, असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.
अमित कल्याणी हे भारतातील एक नामांकित उद्योगपती असून ‘भारत फोर्ज’ आणि कल्याणी समूहातील विविध कंपन्यांमध्ये त्यांचे नेतृत्व आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका कर्मचार्याच्या आत्महत्येपुरते मर्यादित नसून, मोठ्या औद्योगिक घराण्याच्या कामकाज पद्धतीवरही प्रश्न उपस्थित करणारे आहे.
सद्यस्थितीत या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू होणार असून, चाकण पोलिस आता या घटनेच्या सर्व बाजूंची सखोल तपासणी करतील. न्यायालयाच्या आदेशानुसार, नव्याने मिळणारे पुरावे, गायकवाड यांच्या आत्महत्येपूर्वीचे संवाद, त्यांचा कामाचा इतिहास आणि चिठ्ठीत नमूद केलेले आरोप यांचा समावेश करून चौकशी पूर्ण केली जाईल.
ही घटना पुन्हा एकदा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या मानसिक त्रासाबाबतची गंभीरता अधोरेखित करते. न्यायालयीन प्रक्रिया आता पुढे जाईल आणि खरे दोषी कोण हे स्पष्ट होईल.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter