पुण्यातून ट्रेनिंगला निघालेला जवान फरझीन गफूर रहस्यमयरित्या बेपत्ता; बरेलीजवळ अखेरचे लोकेशन
पुण्यातून निघालेला जवान फरझीन गफूर रहस्यमयरित्या बेपत्ता; बरेलीजवळ अखेरचे लोकेशन
AFMC पुणेतील नर्सिंग असिस्टंट फरझीन गफूर ट्रेनिंगसाठी बरेलीला निघाल्यानंतर अचानक बेपत्ता. पत्नीशी शेवटचं बोलणं रात्री 10:30 ला. मोबाईल लोकेशन इज्जतनगर स्टेशनजवळ; गुन्हा दाखल, शोध सुरु.
सायली मेमाणे
पुणे १६ जुलै २०२५ : पुणे : पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (AFMC) येथे नर्सिंग असिस्टंट म्हणून कार्यरत असलेले आणि मूळ केरळमधील गुरुवायूरचे रहिवासी असलेले जवान फरझीन गफूर हे ट्रेनिंगसाठी उत्तर प्रदेशातील बरेली येथे जात असताना रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झाले आहेत. 10 जुलै रोजी मुंबई बांद्रा-रामनगर सुपरफास्ट एक्स्प्रेसने प्रवास सुरू केल्यानंतर रात्री 10:30 च्या सुमारास त्यांनी पत्नी झरीनाशी शेवटचं बोलणं केलं. त्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही.
फरझीन यांची तीन महिन्यांची ट्रेनिंग बरेलीतील मिलिट्री हॉस्पिटलमध्ये होती. मात्र, ते तेथे पोहोचलेले नाहीत आणि ड्युटीवरही हजर झालेले नाहीत. यामुळे कुटुंबीयांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. गुरुवायूर पोलिसांनी केरळ पोलीस अधिनियम, 2011 च्या कलम 57 अंतर्गत (बेपत्ता) गुन्हा दाखल केला असून, सध्या तपास इज्जतनगर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.
फरझीन यांचा मोबाईल फोन शेवटचा इज्जतनगर रेल्वे स्टेशनजवळ सकाळी 4:30 वाजता ॲक्टिव्ह होता. स्टेशनपासून सुमारे 1.3 किलोमीटर अंतरावर असलेल्या ईस्ट नगर येथे त्यांचा फोन शेवटचा ॲक्टिव्ह आढळला आणि त्यानंतर पूर्णपणे बंद झाला.
कुटुंबीय सध्या उत्तर प्रदेशात असून, स्थानिक पोलिसांशी संपर्कात राहून शोधकार्याला मदत करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमधून फरझीन शेवटचे निळ्या रंगाच्या प्युमा टी-शर्टमध्ये दिसले. तीन महिन्यांपूर्वी ते शेवटचे घरी गेले होते. त्यांच्या बेपत्तेमुळे कुटुंबीय प्रचंड चिंतेत आहेत.
फरझीन हे श्री कृष्णा कॉलेजमधून बायोकेमिस्ट्रीमध्ये बॅचलर पदवीधारक असून, पाच वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात भरती झाले होते. ते एक कुशल खेळाडूही होते आणि ट्रिपल जम्प व हर्डल्समध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले होते.
या प्रकरणाची माहिती मिळताच कुटुंबीयांनी स्थानिक आमदार, केंद्रीय मंत्री सुरेश गोपी तसेच केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. लवकरच त्यांच्या बेपत्ता होण्यामागचे कारण स्पष्ट होईल अशी आशा असून, सुरक्षा यंत्रणा तपासात सक्रिय आहे.