पुण्यात अनैतिक संबंधातून सख्ख्या भावाचा खून; गुन्हे शाखेची चौकशी उघड
पुण्यात अनैतिक संबंधातून सख्ख्या भावाचा खून; गुन्हे शाखेची चौकशी उघड
पुण्यात अनैतिक संबंधातून सख्ख्या भावाचा खून; गुन्हे शाखेच्या तपासातून प्रकरण उजेडात, आरोपी भावासह पत्नीला अटक.
सायली मेमाणे
पुणे ८ जुलै २०२५ : पुणे – दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ जुलै रोजी झालेल्या खून प्रकरणाचा थरारक उलगडा झाला असून, मयताचा सख्खा भाऊ व त्याच्या पत्नीमध्ये चाललेल्या अनैतिक संबंधामुळे हा खून घडल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने केलेल्या तांत्रिक तपासामुळे आरोपींचा छडा लागला असून, सख्खा भाऊ व मयताची पत्नी दोघांना अटक करण्यात आली आहे.
पथारेमळा, चन्होली येथील वर्ल्ड सिटी येथील सुरक्षा केबिनच्या समोर दिनांक ४ जुलै ते ५ जुलै २०२५ दरम्यान ३३ वर्षीय धनु दादा लकडे याचा अज्ञात इसमाने डोक्यावर घातक हत्याराने वार करून निर्घृण खून केला होता. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर व अपर पोलीस आयुक्त एस. डी. आवाड यांच्या आदेशानुसार तपास सुरू करण्यात आला. गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाच्या पथकाने मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. पोलीस अंमलदार चव्हाण यांना खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, खून करणारा इसम मृताचा सख्खा भाऊ सोमनाथ दादा लकडे (वय १९) असल्याचे निष्पन्न झाले.
चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे मृताची पत्नी शितल लकडे हिच्याशी अनैतिक संबंध होते. मृत धनु लकडे हे या संबंधाला अडथळा ठरत असल्यामुळे रागाच्या भरात खून केल्याचे आरोपीने स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर पोलीसांना दिशाभूल करण्यासाठी त्याने स्वतःच फिर्यादी म्हणून खोटी माहिती दिली होती.
या प्रकरणातील दुसरी आरोपी महिला शितल धनु लकडे हिलाही गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील तपासासाठी दिघी पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, डॉ. शिवाजी पवार (उप आयुक्त गुन्हे), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोउनि समीर लोंढे यांच्यासह गुन्हे शाखेच्या विविध युनिटच्या पथकांनी केली. तपासात तांत्रिक विश्लेषण, स्थानिक बातमीदार, व शार्प कामगिरीमुळे या गुन्ह्याचा वेगाने छडा लागला.
हा गुन्हा समाजातील घसरत चाललेली नैतिकता व कौटुंबिक संबंधांतील ताण यावर गंभीर प्रश्न उपस्थित करतो. पोलिसांनी वेळेत केलेली कारवाईमुळे आरोपी ताब्यात आले असून न्यायालयीन कारवाईस सुरुवात झाली आहे.