पुण्यात खळबळ! बाजीराव रस्त्यावर भरदिवसा अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून; तीन आरोपी ताब्यात
पुण्यात खळबळ! बाजीराव रस्त्यावर भरदिवसा अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून; तीन आरोपी ताब्यात
पुण्यात भरदिवसा पुन्हा एकदा खूनाची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाजीराव रस्त्यावर अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला.
सायली मेमाणे
५ ऑक्टोबर २०२५ : पुणे : शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारी प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी गणेश काळे नावाच्या रिक्षाचालकाची भरदिवसा हत्या झाली होती. त्या घटनेचा तपास अद्याप सुरू असतानाच, पुन्हा एकदा पुण्यातील मध्यवर्ती भागात खूनाची घटना घडली आहे. बाजीराव रस्त्यावर दुपारच्या सुमारास अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.
ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या बाजीराव रस्त्यावर नागरिकांची नेहमीच मोठी गर्दी असते. अशा गजबजलेल्या भागात उघड्यावर झालेल्या या हत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांना ओळखून अटक केली. या प्रकरणात तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगा आणि आरोपी यांच्यात किरकोळ वाद झाला होता. या वादाचं रूप पुढे हिंसाचारात बदललं आणि आरोपींनी संतापाच्या भरात अल्पवयीन मुलाच्या डोक्यात आणि तोंडावर वार केले. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयात हलवला.
शहराच्या मध्यभागी भरदिवसा अशा प्रकारे हत्या घडल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांचं म्हणणं आहे की, “बाजीराव रस्ता हा शहरातील व्यावसायिक भाग आहे. इथे नेहमी पोलीस गस्त असते, तरीसुद्धा भरदिवसा अशी घटना घडते, हे शहराच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे.”
पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा गंभीरपणे तपास सुरू केला आहे. तीनही आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना जुवेनाईल बोर्डासमोर (बाल न्यायालय) उभं केलं जाणार आहे. पोलीस तपासात प्राथमिक चौकशीदरम्यान समोर आलं की, आरोपी आणि पीडित हे परस्पर परिचित होते. पूर्वी झालेल्या किरकोळ वादावरूनच ही घटना घडल्याचं दिसून येत आहे.
या घटनेनंतर शहरात कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच गणेश काळे या रिक्षाचालकाचा भरदिवसा खून झाल्यानंतर पोलिसांनी गस्त वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र पुन्हा एकदा दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
पुणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सर्व आरोपींची चौकशी सुरू असून, हत्येचं नेमकं कारण आणि वापरलेलं शस्त्र याबाबत तपास सुरू आहे. तसेच परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.