पुण्यात मद्यधुंद चालकाची ट्राफिक डीसीपींच्या गाडीला धडक; वाहनाचे मोठे नुकसान
पुण्यात मद्यधुंद चालकाची ट्राफिक डीसीपींच्या गाडीला धडक; वाहनाचे मोठे नुकसान
पुण्यातील कळसनगर येथे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कारचालकाने ट्राफिक डीसीपी हिम्मत जाधव यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असून चालकावर नशेत वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायली मेमाणे
पुणे १६ ऑगस्ट २०२५ : पुण्यातील कळसनगर भागात १५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री उशिरा झालेल्या अपघाताने मोठी खळबळ उडाली. रात्री सुमारास १० ते १०.३० दरम्यान एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कारचालकाने आपले वाहनावरील नियंत्रण गमावून बसले. या कारचालकाने थेट ट्राफिक विभागाचे उपआयुक्त (डीसीपी) हिम्मत जाधव यांच्या अधिकृत वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात डीसीपींच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून घटनेमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
अपघातानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित चालकाला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात तो चालक पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून (गु.र.नं. व कलम 224/२०२५, बी.एन.एस. कलम २८१, १२५ (ए), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १९९/१५७) अंतर्गत कारवाई सुरू आहे.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ट्राफिक डीसीपी हिम्मत जाधव यांचे वाहन धडक बसल्यानंतर काही वेळ परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. नशेत वाहन चालवण्याच्या घटनांमुळे वारंवार अपघात घडत असून, हा प्रकार पोलिस अधिकारी आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा ठरतो आहे.
या घटनेनंतर पुन्हा एकदा नशेत वाहन चालवण्यावरील नियंत्रणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्याच्या घटना वाढल्या असून, वाहतूक पोलिसांकडून नियमितपणे तपासणी मोहीम राबवली जाते. मात्र त्यानंतरही अशा घटना थांबत नसल्याचे दिसून येते.
वाहतूक तज्ज्ञांच्या मते, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे ही गंभीर बाब असून ती फक्त चालकाच्या जीवावरच नव्हे तर इतर नागरिकांच्या आयुष्यावरही धोका निर्माण करते. पुण्यातील या अपघातामुळे पुन्हा एकदा नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याची आणि जबाबदारीने वाहन चालवण्याची जाणीव करून देणारा धडा मिळाला आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नशेत वाहन चालवू नये आणि नियमांचे पालन करावे.