पुण्यात महामार्गावर प्रवाशांची कारमध्ये लुट; दोघे अटकेत, ₹4.30 लाखाचा मुद्देमाल जप्त
पुणे–बंगळुरू महामार्गावर प्रवाशांना कारमध्ये जबरदस्तीने बसवून लुट करणाऱ्या दोघा आरोपींना अटक
पुणे–बंगळुरू महामार्गावर प्रवाशांना कारमध्ये जबरदस्तीने बसवून लुट करणाऱ्या दोघा आरोपींना अटक. ₹4.30 लाखाचा मुद्देमाल जप्त.
सायली मेमाणे
पुणे १ जुलै २०२५ : पुणे–बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ प्रवाशांना कारमध्ये जबरदस्तीने बसवून मारहाण करत लुटणाऱ्या टोळीतील दोघा आरोपींना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणात ₹4.30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी निखिल अरविंद पवार (वय 27, रा. वेताळनगर, आंबेगाव बुद्रुक) आणि रोहन शाम पवार (वय 27, रा. मानाजीनगर, नर्हे) यांच्याविरुद्ध जबरी चोरी, गुन्हेगारी कट आणि मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
३० मे २०२५ रोजी कोल्हापूरला जाणाऱ्या एका प्रवाशाला नवले पुलाजवळ उभ्या असलेल्या आरोपींनी प्रथम चारचाकी कारमध्ये जबरदस्तीने बसवले आणि नंतर गाडी थोडे पुढे जाताच इतर चार साथीदारांनी त्याला लाथाबुक्यांनी आणि लोखंडी काठ्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात त्याच्याकडून iPhone मोबाईल, सोन्याची बाळी, रोख रक्कम आणि चांदीची अंगठी असा सुमारे ₹4.30 लाख किमतीचा ऐवज हिसकावण्यात आला.
या प्रकरणाचा तपास करताना सिंहगड रोड पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून आरोपींची ओळख पटवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक माहितीच्या आधारे निखिल पवार याला भूमकर चौकात अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर रोहन पवारलाही अटक करण्यात आली. दोघांकडून एक हुंडाई कार आणि चोरलेला iPhone मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
तपासात असेही समोर आले की या टोळीमध्ये आणखी काही साथीदार आहेत, त्यातील एक अल्पवयीन असून दुसरा वेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकलेला आहे. पोलिसांचा पुढील तपास या टोळीच्या इतर सदस्यांना शोधण्यात केंद्रित असून, अशा प्रकारच्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये यापूर्वीही ते सहभागी होते का, याची चौकशी केली जात आहे.
प्रवाशांनी महामार्गावर थांबताना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली असून, अनोळखी वाहनांमध्ये प्रवास टाळावा, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी अशा घटनांची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, जेणेकरून वेळेत कारवाई होऊ शकेल.