ठाणे सिव्हिल रुग्णालयात यशस्वीपणे मोफत प्लॅस्टिक सर्जरी; अंजूच्या चिकटलेल्या बोटांना मिळाली स्वतंत्र हालचाल, गरजूंसाठी मोठा दिलासा.
सायली मेमाणे
ठाणे १ जुलै २०२५ : भिवंडीतील सहा वर्षांच्या अंजू (नाव बदलले आहे) या चिमुकलीला ठाणे सिव्हिल रुग्णालयात यशस्वी प्लॅस्टिक सर्जरीनंतर नवजीवन मिळालं आहे. जन्मतःच तिच्या डाव्या हाताची दोन बोटं — मधले आणि बाजूचे — एकमेकांना चिकटलेली होती, ज्यामुळे लेखन, खेळ, वस्तू उचलणे यासारख्या मूलभूत हालचाली करताना अडथळा निर्माण होत होता. परंतु आता, या शस्त्रक्रियेनंतर ती बोटं स्वतंत्रपणे हालचाल करू शकणार आहेत.
अंजूच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती मध्यमवर्गीय असल्यामुळे खासगी रुग्णालयातील महागड्या शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नव्हता. त्यामुळे त्यांनी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय घेतला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि प्लॅस्टिक सर्जन डॉ. अभिषेक धाकड यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया अंजूच्या डाव्या हातावर नुकतीच पार पडली.
या शस्त्रक्रियेत सुमारे एक तासात चिकटलेली दोन बोटं वेगळी करण्यात आली. डॉक्टरांनी सांगितले की, योग्य फिजिओथेरपी आणि देखरेखीमुळे या बोटांमध्ये पूर्ण हालचाल येईल. अंजूच्या आयुष्यातील ही नवी सुरूवात ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाच्या कष्टाचे प्रतीक ठरली आहे.
या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ सर्जन डॉ. निशिकांत रोकडे, प्लॅस्टिक सर्जन डॉ. अभिषेक धाकड, भूलतज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे, प्रीती पगारे, भक्ती प्रिठे या सर्वांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे एक चिमुकली सामान्य आयुष्य जगण्यास सक्षम झाली आहे.
सामान्यतः अशा प्रकारच्या प्लॅस्टिक सर्जरींसाठी खासगी रुग्णालयांमध्ये लाखोंचा खर्च येतो. परिणामी, गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबे यापासून वंचित राहतात. मात्र, ठाणे सिव्हिलसारख्या सरकारी रुग्णालयांमध्ये आता अशा जटिल सर्जरी मोफत करण्यात येत असल्यामुळे गरजू रुग्णांसाठी ही बाब मोठा दिलासा ठरते आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अशा सर्जरी रुग्णालयात अधिक प्रमाणात करण्याचा प्रयत्न आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter