तुळशीबाग मंडळ ‘मथुरेतील वृंदावन’ साकारणार, तर दगडूशेठ गणपतीच्या आरासात श्री पद्मनाभस्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.
सायली मेमाणे
पुणे १ जुलै २०२५ : पुण्यातील मानाचा चौथा गणपती असलेल्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टने यंदाच्या 125 व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘मथुरेतील वृंदावन’ ही भव्य आरास सादर करण्याचे जाहीर केले आहे. या देखाव्याचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.
या वेळी बोलताना मोहोळ म्हणाले, “लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना रुजवली. पण आजही पुण्यातील मंडळांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा अखंडपणे जपली आहे. हे मंडळ वर्षभर विधायक उपक्रम राबवतात; मात्र त्याची प्रसारमाध्यमांकडून फारशी दखल घेतली जात नाही. या उत्सवाला जागतिक स्तरावर ओळख मिळालेली आहे.”
तुळशीबाग मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित यांनी माहिती दिली की, “यंदाचा देखावा तब्बल ८० फूट रुंद, १२० फूट लांब आणि ३५ फूट उंच असणार आहे. १४ फूट उंचीचे ४० खांब, दहा बाय दहा आकाराचे १४ पॅनल, आणि सुमारे ३० रंगीबेरंगी मोरांनी सजवलेली ‘वृंदावन’ थीम येथे पाहायला मिळणार आहे. राधा-कृष्ण मंदिराचे २० फूट लांब व ४० फूट उंच भव्य प्रवेशद्वारही सजावटीचा भाग असेल. सरपाले बंधूंनी या देखाव्याचे सर्जन केले आहे.”
या व्यतिरिक्त पुण्यातील आणखी एक प्रसिद्ध मंडळ — श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळ — यांच्याकडून यंदाच्या १३३ व्या वर्षी केरळमधील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. या सजावटीच्या शुभारंभासाठी नुकताच वासा पूजन सोहळा पार पडला, ज्यामुळे सजावटीच्या तयारीला औपचारिक सुरुवात झाली.
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव केवळ राज्यातच नाही तर देश-विदेशातही ओळखला जातो. विसर्जन मिरवणुकीपासून ते आकर्षक आरासांपर्यंत प्रत्येक मंडळ आपली परंपरा आणि नवचैतन्य जपत असते. विशेषतः दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक वर्षभर येतात. गणेशोत्सव काळात मंदिराभोवतीची सजावट व धार्मिक वातावरण भक्तांचे लक्ष वेधून घेतं.
गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाचा एक अविभाज्य भाग ठरलेला आहे. वर्षानुवर्षे टिकून असलेल्या या परंपरेमध्ये तंत्रज्ञान, नवकल्पना आणि धार्मिकता यांचं सुंदर मिश्रण पाहायला मिळतं. यंदाही शहरातील मंडळांनी भाविकांसाठी अनेक आकर्षणांची तयारी केली आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter