• Fri. Jul 18th, 2025

NewsDotz

मराठी

पुण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला एक वर्षानंतर अटक

Jul 18, 2025
पुण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला एक वर्षानंतर अटकपुण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला एक वर्षानंतर अटक

पुण्यात २०२४ साली अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी फरार असलेला संदीप वरक याला गुन्हे शाखा युनिट-४ ने विमाननगर येथून अटक केली. पुढील कारवाईसाठी येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले.

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे १८ जुलै २०२५ : पुणे शहरातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०२४ साली घडलेल्या अपहरण आणि बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला अखेर एक वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. आरोपी संदीप संतोष वरक (वय २३, रा. गांधीनगर, येरवडा, पुणे) याने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६३, ३७६, ३७६(२)(एन) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक POSCO कायद्यानुसार कलम ४, ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गेल्या अनेक महिन्यांपासून आरोपी फरार होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट-४चे पथक येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस नाईक शरद झांजरे आणि पोलीस अंमलदार देविदास वांढरे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी विमाननगर येथील दत्त मंदिर चौकाजवळ येणार आहे. तत्काळ पथकाने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केल्यानंतर त्याने आपले नाव संदीप संतोष वरक असल्याचे सांगितले. त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्याकडून माहिती घेतली असता त्याच्याविरुद्ध वरील गंभीर गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले.

अटक केल्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी येरवडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखा युनिट-४ने दाखवलेली दक्षता आणि तत्पर कारवाईमुळे एक गंभीर गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात आला असून पीडितेला न्याय मिळण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार आहे. याप्रकरणी पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.

पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपीस अटक होणे ही पुणे पोलिसांसाठी मोठी यशस्वी कारवाई मानली जात असून अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune