लोहगाव विमानतळावर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एरोमॉल प्रशासनाचा मोठा निर्णय. बुकिंग रद्द करणाऱ्या कॅब चालकांना परिसरात प्रवेशबंदी; दंडात्मक कारवाई होणार.
सायली मेमाणे
पुणे १८ जुलै २०२५ : पुणे येथील लोहगाव विमानतळावर प्रवासी उतरल्यावर कॅब बुक करत असताना अनेक चालक प्रवाशांचे बुकिंग जर अंतर कमी असेल तर रद्द करत असल्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी या समस्येचे प्रमाण अधिक असून प्रवाशांना वेळेवर वाहन मिळण्यात अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून लोहगाव विमानतळाजवळील एरोमॉल प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. प्रवाशांनी केलेल्या तक्रारी लक्षात घेऊन एरोमॉलने ज्या कॅब चालकांकडून वारंवार बुकिंग रद्द केली जात आहे, अशा चालकांना परिसरात प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून काही चालकांनी लोकेशन जवळ असल्याचे कारण देत बुकिंग रद्द केले, तर काहींनी रोख पेमेंट न मिळाल्यास सेवा नाकारली. हे सर्व प्रकार प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंतेचे असून, अशा प्रवृत्तीला आळा बसावा म्हणून प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला आहे. एरोमॉलचे उपाध्यक्ष युवराजसिंग राजपूत यांनी स्पष्टपणे सांगितले की, बुकिंग रद्द करणाऱ्या चालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल आणि त्यांच्या वाहनांना परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. एरोमॉल प्रशासनाच्या सर्वेक्षणानुसार मागील दोन आठवड्यांत सुमारे ३० टक्के कॅब बुकिंग रद्द झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही आकडेवारी लक्षात घेता प्रवाशांसाठी विश्वासार्ह सेवा देण्याच्या उद्देशाने ही कठोर कारवाई करण्यात येत आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter