• Fri. Jul 18th, 2025

NewsDotz

मराठी

राज्यस्तरीय गणेश मंडळ स्पर्धा २०२५ : विजेत्यांना मिळणार ₹५ लाख पर्यंत बक्षीस

Jul 18, 2025
राज्यस्तरीय गणेश मंडळ स्पर्धा २०२५ : महाराष्ट्र सरकारकडून जाहीर, प्रथम क्रमांकासाठी ₹५ लाखांचे बक्षीसराज्यस्तरीय गणेश मंडळ स्पर्धा २०२५ : महाराष्ट्र सरकारकडून जाहीर, प्रथम क्रमांकासाठी ₹५ लाखांचे बक्षीस

महाराष्ट्र सरकारकडून ‘सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा २०२५’ जाहीर; नोंदणीकृत मंडळांना सहभागासाठी २० जुलै ते २० ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार, विजेत्यांना ₹५ लाखांची पारितोषिके आणि प्रमाणपत्रे

सायली मेमाणे

पुणे १८ जुलै २०२५ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे राज्यातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळांसाठी “महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा २०२५” (Maharashtra State Best Public Ganesh Mandal Competition 2025) जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही आणि अर्ज करण्याची प्रक्रिया २० जुलै ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत ऑनलाइन पोर्टलद्वारे होणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश राज्यातील गणेश मंडळांनी पारंपरिक सणाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महाराष्ट्राची दुर्गसंपदा आणि वारसा यांची जपणूक, पर्यावरण संरक्षण, सामाजिक उपक्रम आणि ध्वनीमुक्त साजरेपणास प्रोत्साहन देणे हा आहे.

स्पर्धेतील प्रमुख मूल्यांकन घटक:

  • सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
  • महाराष्ट्राच्या गडकोट व इतिहासाची सादरीकरणे
  • पर्यावरणपूरक सजावट व मूर्तींचा वापर
  • ध्वनीप्रदूषणविरहित उत्सव साजरा करणे
  • सामाजिक उपक्रम व जनजागृती मोहीम

स्पर्धेचा मूल्यांकन प्रक्रियेनुसार जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समित्या तयार करून त्या गणेशोत्सवाच्या काळात (२७ ऑगस्टपासून) संबंधित मंडळांना भेट देतील आणि स्पर्धेचे निरीक्षण करतील. त्या शिफारशी राज्यस्तरीय निवड प्रक्रियेसाठी पुढे पाठवल्या जातील.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून पुढील प्रकारे निवड होईल:

  • पुणे, मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ मंडळांची निवड
  • उर्वरित प्रत्येक जिल्ह्यांतून १ मंडळाची निवड
  • एकूण ४४ मंडळांची निवड राज्यस्तरावर स्पर्धेसाठी होणार

राज्यस्तरावर विजेते ठरवण्यासाठी परीक्षकांची स्वतंत्र समिती स्थापन केली जाणार आहे.

स्पर्धेतील बक्षीस रक्कम खालीलप्रमाणे:

  • प्रथम क्रमांक – ₹५,००,००० आणि प्रमाणपत्र
  • द्वितीय क्रमांक – ₹२,५०,००० आणि प्रमाणपत्र
  • तृतीय क्रमांक – ₹१,००,००० आणि प्रमाणपत्र
  • जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक – ₹२५,००० आणि प्रमाणपत्र

या स्पर्धेमुळे पारंपरिक गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक आणि समाजोपयोगी बनवण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले जात आहे. मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री अशिष शेलार यांनी केले आहे.

स्पर्धेसाठी अर्ज करायचा असल्यास पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या अधिकृत वेबसाइटवरील ऑनलाइन पोर्टलवर जाऊन आवश्यक माहिती भरावी लागेल. अधिक माहितीसाठी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर यांनी केले आहे.

ही स्पर्धा महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक जडणघडणीत लोकसहभागाची नवी ऊर्जा निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune