पुण्याच्या कोथरूड परिसरात जुन्या वादातून १४ वर्षीय मुलावर धारदार हत्याराने हल्ला; कोथरूड पोलिसांनी दोन तरुण व एका अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
सायली मेमाणे
पुणे २४ जुलै २०२५ : पुणे – कोथरूडमधील गुरु गणेश नगर येथील मधुकुंज सोसायटीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर जुन्या भांडणाच्या रागातून धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात दोन तरुणांसह एका अल्पवयीन आरोपीविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेप्रकरणी ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अर्जुन बबन धोत्रे (वय १९, रा. श्रावणधारा सोसायटी, कोथरूड), पवन वाणी (वय १८) आणि एक अल्पवयीन मुलगा या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, आर्म अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटना गुरू गणेश नगरमधील मधुकुंज सोसायटीत घडली. फिर्यादी महिलेचा १४ वर्षीय मुलगा आपल्या सोसायटीत खेळत असताना वरील आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याला अडवले. त्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्र काढून त्याच्या डोक्यावर आणि हातावर वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. जखमी मुलाला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.
या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्याचे अधिकारी तपास करत असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आणि पीडित यांच्यात पूर्वीही वाद झाला होता. त्या वादातूनच ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांनी त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या हल्ल्यामुळे कोथरूडमधील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्ती ही देखील चिंतेचा विषय ठरत आहे. पोलिसांनी या प्रकरणात कठोर पावले उचलून परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीरपणे हाताळण्याची गरज आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter