• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

चिपळूण रेल्वे स्थानकात मनसेचा आक्रमक आंदोलन इशारा

Jul 25, 2025
चिपळूण रेल्वे स्थानकावर मनसेची धडक: ‘पे अँड पार्क’चा ठेका परप्रांतीयांना का? मराठी युवकांना द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराचिपळूण रेल्वे स्थानकावर मनसेची धडक: ‘पे अँड पार्क’चा ठेका परप्रांतीयांना का? मराठी युवकांना द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

चिपळूण रेल्वे स्थानकातील ‘पे अँड पार्क’ ठेका परप्रांतीयाला दिल्याने मनसे आक्रमक; स्थानिक मराठी युवकांना संधी द्यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा.

सायली मेमाणे

पुणे २५ जुलै २०२५ : चिपळूण रेल्वे स्थानकातील ‘पे अँड पार्क’ सेवा परप्रांतीय ठेकेदाराच्या हाती देण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी रविवारी रेल्वे स्थानकात धडक देत अधिकाऱ्यांना चोख जाब विचारला. या ठेक्यामुळे स्थानिक मराठी युवकांवर अन्याय झाल्याचा ठपका ठेवत हा ठेका मराठी तरुणांना द्यावा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी दिला.

मनसेने यापूर्वीही कामथे गावात टँकरद्वारे नदीत सांडपाणी सोडल्याच्या घटनेनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण कार्यालयात जाऊन तीव्र कारवाईची मागणी केली होती. त्याच धर्तीवर स्थानिकांना नाकारून बाहेरील राज्यातील ठेकेदाराला रेल्वेच्या ‘पे अँड पार्क’ सेवा देण्यात आल्याने मनसे आक्रमक झाली आहे. “मराठी माणसाला प्राधान्य मिळाले पाहिजे, अन्यथा परप्रांतीयांना इथे व्यवसाय करू देणार नाही,” असा मनसेचा इशारा ठामपणे देण्यात आला.

संतोष नलावडे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकात उपस्थित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. “येथील जमिनी कोकण रेल्वेला स्थानिकांनीच दिल्या, पण उत्पन्नाच्या संधी मात्र परप्रांतीय घेत आहेत. हे अन्यायकारक आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी परिसरात ‘राज साहेब ठाकरेंचा विजय असो’, ‘दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी कोकण रेल्वेचे अधिकारी बापट यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून ठेका परप्रांतीयांना का दिला गेला याबाबत जाब विचारला. “ज्यांच्या जमिनीवर रेल्वे धावत आहे, त्यांच्याच मुलांना रोजगार नाकारला जातो, हा प्रकार मनसे सहन करणार नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. याशिवाय रेल्वेच्या पँट्री विभागात प्रवाशाला झालेल्या मारहाणीचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि या दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन होईल, असा मनसेचा इशारा आहे.

या आंदोलनात मनसे चिपळूण तालुका अध्यक्ष संदेश साळवी, शहराध्यक्ष राजेंद्र गोंजारी, उपशहराध्यक्ष विनोद चिपळूणकर, माजी विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष सुशांत मोरे, अथर्व कदम, प्रणय कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी मनसेने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत आपली भूमिका लवकरात लवकर स्पष्ट केली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune