RSS च्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिम धर्मगुरूंसोबत दिल्लीमध्ये महत्वाची बैठक घेतली. विविध समुदायांशी संवाद वाढवण्यासाठी संघाचे पाऊल. जाणून घ्या या बैठकीमागील कारण.
सायली मेमाणे
पुणे २४ जुलै २०२५ : मोहन भागवत आणि मुस्लिम धर्मगुरूंची ऐतिहासिक बैठक; संघाच्या शंभराव्या वर्षात संवादाचा नवा अध्याय
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतीच दिल्लीतील हरियाणा भवन येथे मुस्लिम धर्मगुरूंसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. संघाच्या स्थापनेच्या शंभराव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुस्लिम समाजाशी संवाद वाढवण्याच्या उद्देशाने विविध धार्मिक नेते, समाजसेवक आणि विचारवंत सहभागी झाले होते. ही बैठक बंद दरवाजामध्ये पार पडली असून, याविषयी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेत हिजाब, ज्ञानवापी, लोकसंख्या नियंत्रण, आणि धार्मिक सहअस्तित्व यांसारख्या ज्वलंत विषयांचा समावेश होता.
राष्ट्रीय मुस्लिम मंच या संघाशी संलग्न असलेल्या गटाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून संघ मुस्लिम समाजाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. याआधीही मोहन भागवत यांनी २०२२ मध्ये ‘हम एक हैं’ या चर्चासत्रात मुस्लिम विद्वानांशी संवाद साधला होता. त्यानंतरच्या काळात त्यांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठासारख्या संस्थांना भेट दिली होती. या नव्या बैठकीमुळे पुन्हा एकदा संघ आणि मुस्लिम समाजातील संबंध नव्या वळणावर जात असल्याचे संकेत मिळत आहेत.
ही बैठक संघाच्या धोरणातील बदलाची झलक म्हणून पाहिली जात आहे. एका बाजूला संघाचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा पाहिला जातो, तर दुसरीकडे सर्वधर्मसमभावाच्या विचाराला समांतर ठेवत मुस्लिम समाजाशी संवाद वाढवण्याचा प्रयत्न देखील होत आहे. समाजात निर्माण झालेली दरी कमी करून परस्पर विश्वास प्रस्थापित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
या बैठकीचा राजकीय आणि सामाजिक संदर्भात दूरगामी परिणाम होऊ शकतो. २०२५ मध्ये संघाचे शंभरावे वर्ष असल्याने, विविध स्तरांवर कार्यक्रम राबवले जाणार आहेत. त्यात या प्रकारच्या चर्चांना विशेष महत्त्व दिले जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ही केवळ एक बैठक नसून, भविष्यातील अनेक संवादाची नांदी ठरू शकते.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter