पुण्यात रिंगरोडवर सौरऊर्जेवर वीज निर्मिती; महाराष्ट्रातील पहिलाच ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प
पुण्यात रिंगरोडवर सौरऊर्जेवर वीज निर्मिती; महाराष्ट्रातील पहिलाच ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प
पुण्यात बनणाऱ्या बाह्य रिंगरोडवर सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाणार आहे. वृक्षलागवड, पुनर्रोपण आणि पर्यावरणपूरक उपायांसह हा प्रकल्प महाराष्ट्रातील पहिला हरित महामार्ग ठरणार आहे.
सायली मेमाणे
पुणे १७ ऑक्टोबर २०२५ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक सुलभता आणि शहराच्या विकासासाठी बाह्य रिंगरोड प्रकल्पाला नविन आयाम मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) या रिंगरोडवर सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याचा निर्णय घेतला असून, हा प्रकल्प राज्यातील पहिला ग्रीन कॉरिडॉर ठरणार आहे.
सध्या रिंगरोडच्या कामाचा सुमारे 13 टक्के भाग पूर्ण झाला असून, भूसंपादनाची प्रक्रिया जवळजवळ संपुष्टात आली आहे. या महामार्गाचे एकूण अंतर 136 किलोमीटर असून, त्याची रुंदी सुमारे 110 मीटर आहे. रिंगरोड पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यांत बांधला जाणार असून, 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या रिंगरोडवर सौरऊर्जेद्वारे टोलनाके, बोगदे आणि पथदिवे यांसाठी आवश्यक वीज पुरवली जाणार आहे. यामुळे पारंपरिक विजेवरील खर्चात मोठी बचत होईल. समृद्धी महामार्गावर याच तंत्रावर आधी 5 मेगावॉट आणि 4 मेगावॉट क्षमतेचे दोन सौरऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या उभारण्यात आले आहेत, ज्यामुळे दरमहा लाखो रुपयांची वीजबिल बचत झाली आहे. या अनुभवावर आधारित रिंगरोड प्रकल्प अधिक व्यापक स्वरूपात राबविला जात आहे.
रिंगरोडला ग्रीन कॉरिडॉर म्हणून ओळख देण्यासाठी सौरऊर्जेव्यतिरिक्त पर्यावरणपूरक अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. या मार्गावर आठ हजारांहून अधिक झाडांची तोड करावी लागणार आहे, परंतु जवळपास साडेतीन हजार झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. याशिवाय, रिंगरोडच्या कडेला पाच लाखांहून अधिक नवीन वृक्षांची लागवड करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
MSRDCने विचार केला आहे की, या उपक्रमातून निर्माण होणारी अतिरिक्त सौरऊर्जा शेजारील गावांना पुरवली जाईल, ज्यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुधारेल आणि नवीकरणीय ऊर्जा वापर वाढेल. अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी सांगितले की, रिंगरोड ग्रीन कॉरिडॉर म्हणून ओळखला जावा यासाठी सौरऊर्जा वापर, वृक्षांचे पुनर्रोपण आणि नव्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे.
हा प्रकल्प केवळ वाहतूक सुलभता वाढविणारा नाही, तर ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि हरित विकास यांचा संगम ठरणार आहे. सौरऊर्जेमुळे वीज खर्चावर नियंत्रण येईल, वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि इंधनाची बचत होईल. या सर्व घटकांमुळे पुण्याचा बाह्य रिंगरोड प्रकल्प राज्यातील पहिला हरित महामार्ग ठरेल, जो इतर महामार्गांसाठी आदर्श ठरण्याची शक्यता निर्माण करतो.