पुण्यात वाहतूक शिस्तीसाठी पोलिसांची कठोर मोहीम; दररोज पाच हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
पुण्यात वाहतूक शिस्तीसाठी पोलिसांची कठोर मोहीम; दररोज पाच हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
पुणे ट्रॅफिक पोलिसांनी वाहतूक शिस्त राखण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली असून दररोज सुमारे पाच हजार वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, बेकायदेशीर पार्किंग आणि सिग्नल उल्लंघनांवर कठोर पावले उचलण्यात आली आहेत.
सायली मेमाणे
पुणे १ नोव्हेंबर २०२५ : पुणे: शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक शिस्त आणि रस्ते सुरक्षेच्या समस्या अधिक गंभीर बनल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांनी अलीकडेच शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई मोहीम राबवली आहे. पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट बस डेपो, कात्रज चौक यांसारख्या प्रमुख ठिकाणी ही कारवाई सुरू असून दररोज तब्बल पाच हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, अनधिकृत पार्किंग, हेल्मेटशिवाय वाहन चालवणे आणि मोबाइल वापरत ड्रायव्हिंग करणे या नियमभंगांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितले की, ऑक्टोबर महिन्यातच वाहतूक नियमभंगाची १ लाख ५७ हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी ३५ टक्के प्रकरणांमध्ये दंड भरला गेला आहे, तर सुमारे ४५० कोटी रुपयांचा दंड अजूनही प्रलंबित आहे. जाधव यांनी नमूद केले की, वाहतूक कोंडीचे नियंत्रण ‘कंट्रोल रूम’मधून सहा मॉनिटरद्वारे केले जाते. पुण्यात ११०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे शहरातील प्रत्येक प्रमुख चौकांवर लक्ष ठेवले जाते.
त्यांच्या मते, पुणे हे जगातील चौथे सर्वाधिक वाहतूक कोंडीत अडकलेले शहर आहे. बंगळुरूमध्ये ४,५०० वाहतूक पोलीस असून पुण्यात फक्त १,००० कर्मचारी वाहतूक नियंत्रणासाठी कार्यरत आहेत. त्यापैकी ७०० जणच प्रत्यक्ष रस्त्यावर कार्यरत असतात. पुण्याची लोकसंख्या ८० लाख असून, शहरात तब्बल ७२ लाख वाहने आहेत. पार्किंगसाठी जागा मर्यादित असल्याने वाहतूक नियंत्रणात आव्हान निर्माण झाले आहे.
बंडगार्डन वाहतूक विभागाने अलीकडेच पुणे स्टेशन परिसरात विशेष कारवाई मोहीम राबवली. या मोहिमेत ७० वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ५७ वाहनचालकांकडून ३४,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आणि जुना २७,००० रुपयांचा प्रलंबित दंडदेखील वसूल करण्यात आला. विशेषतः राँग साईड वाहन चालवणे आणि बेकायदेशीर पार्किंग या दोन प्रमुख नियमभंगांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांनी ‘पुणे ट्रॅफिक पोलीस’ (PTP) नावाचे अॅप देखील सुरु केले आहे. नागरिक या अॅपवरून उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे फोटो अपलोड करून तक्रार करू शकतात. दररोज सुमारे १,३०० तक्रारी येतात आणि त्यापैकी ८० टक्के प्रकरणांमध्ये २४ तासांत चलन जारी केले जाते.
एटीएमएस प्रणालीद्वारे शहरातील ३२ मुख्य रस्त्यांवरील वाहनगतीचे निरीक्षण केले जाते. ३१ ऑक्टोबर रोजी शहरातील सरासरी वाहनगती २२.६ किमी प्रतितास इतकी नोंदली गेली. ही आकडेवारी वाहतूक कोंडी किती गंभीर पातळीवर पोहोचली आहे, याचे निदर्शक आहे. पोलिसांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून शिस्तबद्ध आणि सुरक्षित वाहतुकीसाठी प्रशासनाशी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.