पुण्यात हवेची गुणवत्ता खालावली: दिल्लीच्या वाटेवर, अतिसूक्ष्म धूलिकणांचं प्रमाण धोकादायक
पुण्यात हवेची गुणवत्ता खालावली: दिल्लीच्या वाटेवर, अतिसूक्ष्म धूलिकणांचं प्रमाण धोकादायक
पुण्यात हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत असून, दिल्लीप्रमाणे प्रदूषणाची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या अहवालानुसार १७४ दिवस हवा मध्यम आणि ३ दिवस वाईट स्तरावर होती; अतिसूक्ष्म धूलिकण आरोग्यासाठी घातक ठरत आहेत.
सायली मेमाणे
पुणे 30 जुलै २०२५ : पुणे शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या उत्तम आणि शुद्ध हवेसाठी प्रसिद्ध असले तरी सध्याच्या घडीला ही ओळख संकटात सापडली आहे. पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार शहराची हवेची गुणवत्ता सातत्याने ढासळत आहे आणि दिल्लीसारख्या अतिप्रदूषित शहरांच्या पंक्तीत जाण्याचा धोका वाढत आहे.
या अहवालातून स्पष्ट झालं की सलग दुसऱ्या वर्षी पुण्यात ३ दिवस आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक स्तराची हवा नोंदवली गेली. तसेच १७४ दिवस हवा मध्यम दर्जाची होती, मात्र त्यात सूक्ष्म (PM2.5) आणि अतिसूक्ष्म (PM10) धूलिकणांचे प्रमाण राष्ट्रीय मानकांपेक्षा अधिक होते. वर्षभरात केवळ ५२ दिवस हवेची गुणवत्ता ‘उत्तम’ नोंदवण्यात आली. ही परिस्थिती नागरिकांच्या आरोग्यासाठी चिंतेची बाब ठरत असून, विशेषतः श्वसन संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे.
केंद्र सरकारच्या ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम’ अंतर्गत पुणे शहराची निवड करण्यात आली असून, गेल्या चार वर्षांपासून महापालिका प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना राबवत आहे. या योजनांसाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मात्र, महापालिकेच्या प्रयत्नांना अजून अपेक्षित यश आलेले नाही कारण अनेक उपाययोजना दीर्घकालीन असून त्यांचे परिणाम लगेच जाणवत नाहीत. काही वर्षांपूर्वी पुण्यात वर्षातील बहुतेक दिवस ‘उत्तम’ किंवा ‘समाधानकारक’ हवेचे नोंदवले जायचे, पण अलीकडे ‘मध्यम’ आणि ‘वाईट’ गुणवत्तेच्या दिवसांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
विविध शैक्षणिक आणि संशोधन संस्थांच्या मदतीने संकलित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, या धोकादायक हवेमुळे लहान मुले, वयोवृद्ध आणि श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त व्यक्तींना सर्वाधिक त्रास होत आहे. पुणेकरांना शुद्ध हवा मिळावी यासाठी प्रदूषणावर त्वरित उपाययोजना राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.