पुणे शहरातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथक २ (Anti-Narcotics Cell) यांनी मोठी कारवाई करत १२ लाख १२ हजार ३६० रुपये किमतीचा ५९.४०० ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. ही कारवाई १४ जून २०२५ रोजी करण्यात आली.
ही धडक मोहीम पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक, महिला उपनिरीक्षक अस्मिता लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पेट्रोलिंग दरम्यान केली. पोलीस अंमलदार सय्यद साहिल नजीर शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, बुधवार पेठेतील बाटा बोळ, लक्ष्मी रोड येथे कारवाई करण्यात आली.
तपासादरम्यान शरणप्पा नागाप्पा कटिमणी (वय ३४, रा. कात्रज, पुणे) या व्यक्तीकडून संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्याची झडती घेतली असता १२.१२ लाख किमतीचा मॅफेड्रॉन आणि रोख रक्कम तसेच इतर साहित्य पोलिसांनी हस्तगत केले. आरोपी हा मूळचा कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील असून त्याच्याविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११८/२०२५, एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८(क), २१(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहायक आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, आणि गुन्हे शाखेचे उप-आयुक्त निखिल पिंगळे तसेच सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस अंमलदार अझीम शेख,चेतन गायकवाड, मयुर सूर्यवंशी, साहिल शेख, उदय राक्षे, संदीप शेळके, योगेश मांढरे, युवराज कांबळे, आझाद पाटील, निलम पाटील, दिशा खेवलकर आणि रविंद्र रोकडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून आरोपीचा अंमली पदार्थांच्या नेटवर्कशी संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे. पुणे पोलिसांची ही कारवाई अंमली पदार्थ विरोधातील मोहिमेत एक मोठे यश मानले जात आहे.