पुत्रदा एकादशी 2025: पंढरपूरात विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी, व्यवस्थेचा बोजवारा

पुत्रदा एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल भक्तांची प्रचंड गर्दी
श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीच्या दिवशी पंढरपूरात ५० हजारांहून अधिक भाविकांची गर्दी; विठ्ठलाच्या दर्शनासाठी ८-१० तासांची वाट पाहावी लागत आहे. मात्र, व्यवस्थेचा अभाव जाणवतोय.
सायली मेमाणे
पुणे ५ ऑगस्ट २०२५ : पंढरपूर – पवित्र श्रावण महिन्यातील अत्यंत महत्वाची मानली जाणारी पुत्रदा एकादशी आज (५ ऑगस्ट २०२५) देशभरात भक्तिभावाने साजरी केली जात आहे. विशेषतः पंढरपूरच्या श्री विठोबा-रुखमिणी मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली असून, तब्बल ५०,००० हून अधिक भक्तगण दर्शन रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
भाविकांची ही भक्तिभावाची लाट आज सकाळपासूनच पंढरपूर शहरात पाहायला मिळत आहे. गोपाळपूर रोडपासून मंदिरापर्यंत रांगेचे फुटपाथवर पोहोचणे ही प्रशासनाच्या अपयशाची साक्ष देत आहे. लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी ८ ते १० तास रांगेत उभे राहून प्रतिक्षा करत आहेत.
मात्र, इतकी गर्दी असूनही एकादशीसारख्या मोठ्या दिवशी पुरेशा दर्शन व्यवस्थेचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. ना पुरेशी छावणी, ना पिण्याच्या पाण्याची सोय, ना गर्दी नियंत्रित करणारे यंत्रणा – यामुळे अनेक भाविक त्रस्त झाल्याचे दिसून आले.
स्थानिक प्रशासन, मंदिर समिती आणि पोलीस यंत्रणा यांच्या एकत्रित प्रयत्नांअभावी व्यवस्था कोलमडल्याचे चित्र समोर आले आहे.
श्रावण महिन्याच्या एकादशीसाठी दरवर्षी हजारो भाविक पंढरपूरात येतात. यावर्षीही ही परंपरा जोपासताना भक्तांनी ‘विठ्ठल विठ्ठल’च्या जयघोषात मंदिर परिसर भरून टाकला आहे. मात्र, सुरळीत दर्शन होण्यासाठी भाविकांना अत्यंत मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
“सकाळी पाच वाजल्यापासून आम्ही रांगेत उभे आहोत, अजूनही दर्शन झालेले नाही,” असे सांगताना अनेक भाविकांनी व्यवस्था सुधारण्याची मागणी केली आहे.
पुत्रदा एकादशी हा श्रद्धा आणि भक्तीचा दिवस असला तरी, व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने पुढील वेळेस ठोस पावले उचलण्याची गरज आहे. विठ्ठल भक्तांची आस्था टिकवायची असेल, तर पंढरपूरमध्ये यात्रा व्यवस्थापन अधिक सुयोग्य पद्धतीने करणे अत्यंत आवश्यक आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter