पोळा सण 2025 : येवला बाजारपेठेत बैल सजावटीच्या साहित्यांच्या किमतीत 20% पर्यंत वाढ
पोळा सण 2025 : येवला बाजारपेठेत बैल सजावटीच्या साहित्यांच्या किमतीत 20% पर्यंत वाढ
येवला तालुक्यात पोळा सणाची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी बैल सजवण्यासाठी बाजारात खरेदी करत आहेत. यावर्षी बैल सजावटीच्या साहित्यांच्या किमती 15-20% ने वाढल्या असून पारंपरिक झुल, घंटा, मण्यांच्या माळा, शिंगांच्या झिलईचे रंग बाजारात उपलब्ध आहेत.
सायली मेमाणे
पुणे २० ऑगस्ट २०२५ : येवला (नाशिक जिल्हा): महाराष्ट्रातील शेतकरी समाजासाठी पोळा सणाला अत्यंत विशेष महत्त्व आहे. शेतकऱ्याच्या मेहनतीचा साथीदार असलेल्या बैलजोडीचे पूजन करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. येवला तालुक्यात पोळ्याची लगबग सुरू झाली असून यंदा बैल सजावटीच्या साहित्यांच्या किमतींमध्ये 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकरी बांधवांना अधिक खर्च करावा लागत आहे.
पोळा सणानिमित्त येवला शहर आणि आसपासच्या बाजारपेठांमध्ये पारंपरिक साहित्यांचा भरपूर साठा दाखल झाला आहे. बैल सजावटीसाठी झुल, रंगीबेरंगी दोर, मण्यांच्या माळा, कवड्या, टोप्या, पितळी घंटा, शिंगांच्या झिलईसाठी रंग व चमकदार कपडे विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. या साहित्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली असून बाजारपेठा गजबजल्या आहेत.
व्यापाऱ्यांच्या मते, मागील काही महिन्यांपासून कापड, पितळ, प्लास्टिक साहित्य आणि सजावटीच्या रंगांच्या कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम बैल सजावटीच्या साहित्यांवर झाला आहे. यावर्षी किमतींमध्ये साधारणपणे 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली असून मागील वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांना अधिक खर्च करावा लागत आहे.
शेतकरी बांधव मात्र या वाढलेल्या दरांकडे दुर्लक्ष करत आपल्या बैलजोडीला आकर्षक व पारंपरिक पद्धतीने सजवण्यासाठी सजावटीचे साहित्य विकत घेत आहेत. पोळ्याच्या दिवशी बैलांना तेल-उटणे लावून स्नान घालणे, त्यानंतर त्यांना झुल, मण्यांच्या माळा, पितळी घंटा, शिंगांना रंग लावणे आणि पारंपरिक पद्धतीने सजवणे हे शेतकऱ्यांसाठी अभिमानाचे क्षण असतात.
पोळा सण हा केवळ धार्मिक परंपरा नसून शेतकऱ्याच्या जीवनातील आनंदाचा दिवस मानला जातो. येवला तालुक्यातील बाजारपेठेत सध्या रंगतदार दृश्य दिसत आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर बैल सजविण्याचा उत्साह स्पष्टपणे दिसत असून पोळ्याच्या स्वागतासाठी सर्वत्र जल्लोष सुरू आहे.