फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेचा मोठा प्रहार; दोन महिन्यांत 4.30 लाखांवर कारवाई, 30 कोटींचा दंड वसूल

0
फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेचा मोठा प्रहार; दोन महिन्यांत 4.30 लाखांवर कारवाई, 30 कोटींचा दंड वसूल

फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेचा मोठा प्रहार; दोन महिन्यांत 4.30 लाखांवर कारवाई, 30 कोटींचा दंड वसूल

मध्य रेल्वेने एप्रिल-मे 2026 दरम्यान विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या 4.30 लाख प्रवाशांवर कारवाई करत 30.13 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. एसी लोकल, मेल-एक्स्प्रेस आणि लोकल गाड्यांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली.

विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने मोठी मोहीम हाती घेतली असून, अवघ्या दोन महिन्यांत लाखो प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. एप्रिल आणि मे 2026 या कालावधीत मुंबई विभागातील तिकीट तपासणी पथकांनी विशेष तपासणी मोहीम राबवत तब्बल 4 लाख 30 हजार प्रकरणे उघडकीस आणली आहेत. या कारवाईतून 30 कोटी 13 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ विक्रमी मानली जात आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मेल-एक्स्प्रेस गाड्या, उपनगरीय लोकल, एसी लोकल तसेच प्रमुख रेल्वे स्थानकांवर नियमित तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर मोठा अंकुश बसल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 2.75 लाख प्रकरणांमधून 12.02 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. मात्र यंदा कारवाईच्या प्रमाणात आणि दंड वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे.

मे 2026 या एकाच महिन्यात 2.02 लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून 14 कोटी रुपयांचा महसूल रेल्वेला मिळाला. गेल्या वर्षी याच महिन्यात 1.30 लाख प्रकरणे नोंदवली गेली होती. त्यामुळे कारवाईच्या संख्येत 56 टक्क्यांहून अधिक आणि महसुलात 135 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.

विशेष म्हणजे मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधील स्लीपर आणि जनरल डब्यांमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली. एप्रिल ते मे 2026 दरम्यान या विभागात 3.04 लाख प्रकरणे नोंदवली गेली. त्यातून 24.77 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मागील वर्षी याच कालावधीत 2.02 लाख प्रकरणांमधून 10.12 कोटी रुपयांचा दंड वसूल झाला होता. त्यामुळे या विभागातही महसुलात मोठी वाढ दिसून आली आहे.

एसी लोकलमध्येही विनातिकीट किंवा चुकीच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. या दोन महिन्यांत एसी लोकलमध्ये 25 हजार 924 प्रकरणे नोंदवली गेली असून त्यातून 80.97 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रकरणांमध्ये 23 टक्के आणि महसुलात 18 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

याशिवाय प्रथम श्रेणीतील अनधिकृत प्रवास, भाडेफरक न भरता केलेला प्रवास आणि विनाबुकिंग सामान वाहतूक करणाऱ्यांविरोधातही मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. प्रथम श्रेणीतील 23 हजार 447 प्रकरणांमधून 74.61 लाख रुपये, भाडेफरकाच्या 58 हजार 748 प्रकरणांमधून 3.61 कोटी रुपये आणि विनाबुकिंग सामान वाहतुकीच्या 17 हजार प्रकरणांमधून 19.45 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. भविष्यातही अशा विशेष तपासणी मोहिमा अधिक तीव्रतेने राबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांसाठी आगामी काळात अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed