बाणगंगेच्या आरतीचा तिढा सुटला! त्रिपुरी पौर्णिमेला होणार भव्य महाआरती; प्रशासनाने दिली परवानगी
बाणगंगेच्या आरतीचा तिढा सुटला! त्रिपुरी पौर्णिमेला होणार भव्य महाआरती; प्रशासनाने दिली परवानगी
मुंबईतील वाळकेश्वर येथील बाणगंगेवरील भव्य महाआरतीसाठी अखेर परवानगी मिळाली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मध्यस्थीने पोलिस प्रशासनाने त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी आरतीस परवानगी दिली. दरवर्षी हजारो भाविक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात.
सायली मेमाणे
पुणे ३० ऑक्टोबर २०२५ : मुंबईतील वाळकेश्वर येथील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ असलेल्या बाणगंगेवरील महाआरतीला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरतीसंदर्भात परवानगीवरून निर्माण झालेला तिढा आता सुटला असून, त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच ७ नोव्हेंबर २०२५ रोजी भव्य आरतीचे आयोजन होणार आहे.
या निर्णयामुळे मुंबईकरांसह राज्यभरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने या वादाला तोडगा काढण्यात आला. यासंदर्भात पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे, बाणगंगा ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त महाले, इतर पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस प्रशासनाने आरतीला अखेर परवानगी दिली असल्याची माहिती ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
सुरुवातीला दक्षिण मुंबईतील वाहतूक नियंत्रणाच्या अडचणीमुळे या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. ३ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी या संदर्भात ट्रस्टला अधिकृत पत्रही दिलं होतं. मात्र, शहरातील नागरिक, भाविक आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन मंत्री लोढा यांनी स्वतः हस्तक्षेप केला. त्यांनी प्रशासनाला योग्य ती उपाययोजना करून धार्मिक कार्यक्रम पार पाडण्याचे निर्देश दिले.
दरवर्षी बाणगंगेवरील ही महाआरती अत्यंत भव्य स्वरूपात आयोजित केली जाते. हजारो भाविक, विशेषतः सारस्वत गौड ब्राह्मण समाज या दिवशी एकत्र येतात. ही आरती वर्षातून फक्त एकदाच होते आणि ती संध्याकाळी आयोजित केली जाते. आरतीदरम्यान शेकडो दिवे प्रज्वलित केले जातात, ज्यामुळे परिसर अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक वातावरणाने उजळून निघतो.
या आरतीची भव्यता वाराणसीच्या गंगा आरतीप्रमाणे असल्याचे मानले जाते. मुंबईतील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत या आरतीला विशेष स्थान आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक त्या सर्व सुरक्षात्मक आणि वाहतूक व्यवस्थेच्या योजना आखण्याचे ठरवले आहे.
यावर्षीच्या जीएसबी टेंपल ट्रस्टला राज्य सरकारच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने पारंपरिक पूजेची परवानगी आधीच दिली आहे. त्यामुळे धार्मिक परंपरा कायम ठेवण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही, अशी खात्री ट्रस्टने दिली आहे.
या निर्णयामुळे बाणगंगा परिसरात पुन्हा एकदा दिव्यांचा महासागर उजळणार असून, मुंबईकरांसाठी हा सोहळा अविस्मरणीय ठरणार आहे. ट्रस्टने मंत्री मंगलप्रभात लोढा आणि पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.