बावधनमध्ये 36 मीटर रस्ता, ड्रेनेज आणि पावसाळी लाईनच्या कामाला वेग; अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केली पाहणी

0
बावधनमध्ये 36 मीटर रस्ता, ड्रेनेज आणि पावसाळी लाईनच्या कामाला वेग; अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केली पाहणी

बावधनमध्ये 36 मीटर रस्ता, ड्रेनेज आणि पावसाळी लाईनच्या कामाला वेग; अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केली पाहणी

बावधन परिसरातील 36 मीटर रस्ता, ड्रेनेज आणि पावसाळी लाईनचे दीर्घकाळ रखडलेले काम अखेर वेगाने सुरू होणार आहे. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी स्थळ पाहणी करून विभागांना तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले.


सायली मेमाणे

४ ऑक्टोबर २०२५ : पुणे : बावधन परिसरातील चांदणी चौक ते पाषाण दरम्यानचा 36 मीटर मुख्य रस्ता, ड्रेनेज आणि पावसाळी लाईनचे रखडलेले काम आता गती घेणार आहे. दीर्घकाळापासून या कामामुळे नागरिकांना वाहतुकीची मोठी गैरसोय, साचलेल्या पाण्यामुळे अस्वच्छता आणि आरोग्यविषयक त्रास सहन करावा लागत होता. अखेर अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी आज स्थळ पाहणी करून या कामाची प्रगती तपासली आणि संबंधित विभागांना तातडीने काम सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

बावधन हे गेल्या काही वर्षांत वेगाने विकसित होत असलेले निवासी आणि व्यावसायिक केंद्र आहे. परंतु, येथील पायाभूत सुविधा विकासाची गती अपुरी असल्याने नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि सांडपाणी व्यवस्थेच्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः चांदणी चौक ते पाषाण या मार्गावरील 36 मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडले होते. त्यामुळे नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी या कामाच्या मंजुरीपासून ते अंमलबजावणीपर्यंत सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी प्रशासनाशी अनेक बैठका घेत कामाला गती देण्याचा आग्रह धरला. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून अतिरिक्त आयुक्तांनी आज प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून विभागांना वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.

या पाहणीत पथ विभागाचे अजित आंबेकर, भुताडा, सुनिल भोंगळे, मालमत्ता विभागाचे उपआयुक्त प्रशांत ठोंबरे आणि अभिषेक घोरपडे, बांधकाम विभागाचे अधिकारी बोबडे आणि महेश शेळके, भू संपादन विभागाचे मोरे, तसेच कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय नायकल, आरोग्य अधिकारी, अभियंते आणि ड्रेनेज विभागाचे सुभाष फावरा, अजिक्य वानखडे आणि रुचिता बावणकर उपस्थित होते.

या प्रकल्पात रस्ता, सांडपाणी व्यवस्थापन आणि पावसाळी लाईन यांचा समन्वय साधून संपूर्ण पायाभूत सुविधा सुधारणा करण्यात येणार आहे. पावसाळ्यात साचणारे पाणी आणि चिखलामुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करणे हे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण, नालेसफाई आणि सांडपाणी वाहिनीचे जाळे दुरुस्तीचे काम एकाच टप्प्यात पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण काम करण्याचे आणि नागरिकांच्या तक्रारींवर प्राधान्याने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या कामाच्या अंमलबजावणीनंतर बावधन परिसरातील वाहतुकीत सुलभता येईल, तसेच पावसाळ्यात होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात दूर होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नागरिकांनीही या कामाला गती मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून, भविष्यात या परिसरात शाश्वत पायाभूत विकासाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *