बीड जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था कोलमडली; 592 धोकादायक वर्गखोल्या, विद्यार्थी झाडाखाली शिकण्यास मजबूर

0
बीड जिल्ह्यातील तब्बल 592 वर्गखोल्या धोकादायक स्थितीत असल्याचं स्पष्ट झालं

बीड जिल्ह्यातील तब्बल 592 वर्गखोल्या धोकादायक स्थितीत असल्याचं स्पष्ट झालं

बीड जिल्ह्यातील तब्बल 592 वर्गखोल्या मोडकळीस; विद्यार्थ्यांना झाडाखाली शिकवण्याची वेळ, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते संतप्त.

सायली मेमाणे

२१ जून २०२५ : बीड जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर जे चित्र समोर आलं आहे, ते खरोखर धक्कादायक आहे. राज्यभरात विद्यार्थ्यांचे स्वागत शैक्षणिक उपक्रमांनी होत असताना, बीड जिल्ह्यातील तब्बल 592 वर्गखोल्या धोकादायक स्थितीत असल्याचं स्पष्ट झालं आहे. या खोल्यांत विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून बसवले जात असून काही ठिकाणी तर थेट झाडांखाली वर्ग घेतले जात आहेत.

बीड जिल्हा परिषदेकडील एकूण 2474 शाळांपैकी 349 शाळांमध्ये ही समस्या आहे. त्यापैकी 2415 प्राथमिक आणि 49 माध्यमिक शाळा आहेत. एकट्या गेवराई तालुक्यातील 62 शाळांमध्ये 125 वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. आष्टी, परळी, पाटोदा, अंबेजोगाई, बीड, धारूर, केज, माजलगाव, शिरूर आणि वडवणी तालुक्यांमध्येही अशीच बिकट अवस्था आहे.

शाळांच्या इमारतींच्या दुरवस्थेची माहिती समोर आल्यानंतर पालकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनेही केली आहेत. मात्र, अद्यापही प्रत्यक्षात कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. ‘विद्यार्थ्यांचे स्वागत सोहळे नकोत, आधी सुरक्षित वर्गखोल्या द्या’ अशी संतप्त मागणी पालकांनी आणि सामाजिक संस्थांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण अधिकारी भगवान फुलारी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “पाहणी केल्यानंतरच ठरवू – दुरुस्ती करायची की नव्याने इमारत उभारायची?” मात्र हे उत्तर टाळाटाळ करणारे असल्याचे पालक आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना पावसात भिजत शिकावे लागते, उन्हात झाडाखाली बसावे लागते, हे दृश्य 21व्या शतकातील भारतात अयोग्य आणि लाजिरवाणं आहे. शिक्षणाचा हक्क अधिनियम कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.

या परिस्थितीत त्वरीत उपाययोजना करत निधी उपलब्ध करून धोकादायक वर्गखोल्यांची दुरुस्ती करणे अत्यावश्यक ठरत आहे. अन्यथा भविष्यात दुर्घटनांची शक्यता नाकारता येणार नाही. शिक्षण मंत्रालयाने आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पालकांच्या विश्वासाला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे.

Do-follow Links:
🔗 Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
🔗 YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
🔗 Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
🔗 Twitter: https://x.com/NewsDotz

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed