भाजपमधील इनकमिंगवर नितीन गडकरींचा थेट इशारा; “जेवढ्या वेगाने वाढते, तेवढ्याच वेगाने खाली येईल”

0
भाजपमधील इनकमिंगवर नितीन गडकरींचा थेट इशारा; "जेवढ्या वेगाने वाढते, तेवढ्याच वेगाने खाली येईल"

भाजपमधील इनकमिंगवर नितीन गडकरींचा थेट इशारा; "जेवढ्या वेगाने वाढते, तेवढ्याच वेगाने खाली येईल"

भाजपमध्ये सुरु असलेल्या मोठ्या इनकमिंगवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा थेट इशारा. जुन्या कार्यकर्त्यांची कदर करा, नाहीतर पक्षाची वाढ थांबेल, असं गडकरींनी स्पष्ट सांगितलं.

सायली मेमाणे

पुणे २७ ऑक्टोबर २०२५ : नागपूर : भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या इतर पक्षांतून मोठ्या प्रमाणात नेत्यांचा ओघ वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट पक्ष नेतृत्वालाच इशारा दिला आहे. “पक्षाची जेवढ्या वेगाने वाढ सुरू आहे, तेवढ्याच वेगाने खाली येईल, जर जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झालं तर,” असं वक्तव्य त्यांनी करताच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

गडकरी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र भाजपचे ज्येष्ठ नेते आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी गडकरींनी पक्ष संघटनेच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर भाष्य करताना जुन्या कार्यकर्त्यांच्या योगदानावर विशेष भर दिला.

गडकरी म्हणाले, “जुना कार्यकर्ता हा घरकी मुर्गी दाल बराबर असतो, तर बाहेरून आलेले सावजी चिकन मसाला असतात.” त्यांनी नागपुरी शैलीत केलेलं हे वक्तव्य उपस्थितांमध्ये हशा पिकवत असलं तरी त्यामागचा संदेश गंभीर होता. त्यांनी पुढे स्पष्ट सांगितलं की, “डॉ. राजीव पोतदार हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, पण बावनकुळे त्याकडे लक्ष देत नाहीत. जुने कार्यकर्ते हेच पक्षाचे खरे बळ आहेत.”

गडकरींच्या वक्तव्यातून स्पष्ट संकेत मिळाले की, सध्याच्या काळात पक्षात नवे चेहरे मोठ्या प्रमाणात सामील होत असले तरी मूळ संघटनाची पायाभरणी करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांची कदर कमी होत चालली आहे. त्यांनी याबाबत नेतृत्वाला सावध करताना सांगितलं की, “प्रामाणिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्यास पक्षाची वाढ टिकणार नाही. जेवढ्या वेगाने वाढते, तेवढ्याच वेगाने खाली येईल.”

या वक्तव्यानंतर भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारे उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे. अनेकांना वाटतंय की गडकरींनी त्यांच्या भावना थेट व्यक्त केल्या आहेत. पक्षात जुन्या कार्यकर्त्यांना योग्य स्थान आणि सन्मान मिळावा, ही मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे.

गडकरी हे भारतीय राजकारणातील प्रामाणिक आणि स्पष्टवक्ते नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी पक्षाच्या वाढीमध्ये काम केलेल्या कार्यकर्त्यांचे योगदान अनेकदा गौरवले आहे. त्यांच्या या विधानामुळे सध्याच्या भाजप नेतृत्वाला जुन्या कार्यकर्त्यांशी नव्याने संवाद साधण्याची प्रेरणा मिळू शकते.

राजकीय विश्लेषकांच्या मते, सध्याच्या काळात विविध पक्षांमधून नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. या इनकमिंगमुळे संघटनेची ताकद वाढत असली तरी, अंतर्गत असंतोषही निर्माण होऊ शकतो. गडकरींचं हे वक्तव्य म्हणजे संघटनात समतोल राखण्याचा आणि मूळ कार्यकर्त्यांच्या योगदानाची आठवण करून देण्याचा एक प्रयत्न आहे.

गडकरींनी दिलेला हा थेट इशारा पक्षाच्या आगामी धोरणांवर आणि संघटनात्मक बदलांवर परिणाम करू शकतो. त्यांच्या वक्तव्यानंतर आता पक्षात जुन्या कार्यकर्त्यांच्या पुनर्सन्मानाची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed