महागाईपासून दिलासा मिळावा; गणरायाला खडसेंची प्रार्थना
महागाईपासून दिलासा मिळावा; गणरायाला खडसेंची प्रार्थना
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सह पत्नीक गणेशपूजन करून महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांना महागाईतून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना गणरायाकडे केली. मुक्ताईनगर फार्महाऊसमध्ये गणेशोत्सवाची स्थापना.
सायली मेमाणे
पुणे २७ ऑगस्ट २०२५ : मुक्ताईनगर (जळगाव) : गणेशोत्सवाच्या मंगल वातावरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या फार्महाऊसमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करत विशेष प्रार्थना केली. पत्नींसह विधीवत पूजा करून खडसे यांनी गणरायाकडे महाराष्ट्रातील शेतकरी, नागरिक आणि सामान्य जनतेला महागाईतून दिलासा मिळावा असे साकडे घातले.
मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशभरात महागाईने मोठा कहर केला आहे. शेतमालाचे दर कोसळले असून कृषी उत्पादनांच्या किंमतीत घट झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. दुसरीकडे रोजच्या वापरातील वस्तूंवर दरवाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल, गॅस तसेच अन्नधान्याच्या किंमतींनी सामान्य नागरिकांना चांगलाच त्रास दिला आहे.
या पार्श्वभूमीवर खडसेंनी गणरायाच्या चरणी प्रार्थना करताना सांगितले की, “गणपती बाप्पाने महागाईपासून शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि सर्व समाजात समाधान व शांती नांदो.”
मुक्ताईनगर परिसरात खडसेंच्या गणेशोत्सवाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतात. यंदाही गणेशप्रतिष्ठापना सोहळ्याला स्थानिक कार्यकर्ते, समर्थक आणि गावकरी मोठ्या संख्येने हजर होते. या प्रसंगी भक्तांनी गणपती बाप्पाच्या जयघोषात वातावरण भारावून गेले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने केलेली खडसेंची ही प्रार्थना महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या वेदनांना स्पर्श करणारी ठरली आहे. महागाईमुळे त्रस्त असलेल्या शेतकरी व नागरिकांसाठी ही भावना समाजातील आशेचा किरण म्हणून पाहिली जात आहे.