महाराष्ट्रातील पाल गावाची अनोखी परंपरा, लग्न कधीही असो, हळद मात्र रविवारीच!
पाल गावात लग्न कोणत्याही दिवशी असलं तरी हळद रविवारीच लावली जाते.
छत्रपती संभाजीनगरच्या पाल गावात एक अनोखी परंपरा पाळली जाते. लग्न कोणत्याही दिवशी असलं, तरी हळदीचा कार्यक्रम फक्त रविवारीच केला जातो.
सायली मेमाणे
२५ जून २०२५ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात वसलेलं पाल हे गाव एका विशेष परंपरेमुळे चर्चेत आहे. या गावात कोणत्याही दिवशी लग्न असो, पण हळदीचा कार्यक्रम मात्र फक्त रविवारीच होतो. ही परंपरा गावात सुमारे 250 ते 300 वर्षांपासून पाळली जात आहे. गावकऱ्यांच्या मते, एका दुःखद घटनेनंतर ही प्रथा सुरु झाली आणि आजही संपूर्ण गाव ती निष्ठेने पाळत आहे.
फुलंब्री तालुक्यातील या पाल गावाची लोकसंख्या सुमारे बाराशेच्या आसपास असून, त्यातील 95 टक्के नागरिक जाधव कुटुंबीय आहेत. शेती हा मुख्य व्यवसाय आहे आणि गावाजवळच हेमाडपंथी शैलीतील सुमारे हजार वर्षे जुनं सिद्धेश्वर मंदिरही आहे. परंपरा जपणारा आणि अध्यात्मिक वारसा लाभलेला हा गाव आता या वैशिष्ट्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे.
गावात कोणत्याही घरात लग्न ठरलं तरी हळदीचा मुहूर्त फक्त रविवारी घेतला जातो. त्या दिवशी सर्व घरातील विजेचे दिवे बंद केले जातात. नंतर बंद खोलीत सात गव्हाच्या कणकेचे दिवे ताटात ठेवून लावले जातात. या दिव्यांपुढे देवीची आराधना केली जाते. त्यानंतर नवरा किंवा नवरी व पाच महिलांसमवेत बंद खोलीत हळद लावली जाते. या विधीला इतर कोणीही हजर राहत नाही. ही परंपरा घराघरांत अत्यंत श्रद्धेने आजही चालू आहे.
या परंपरेच्या मागे एक शोकांतिका दडलेली आहे. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार, तीनशे वर्षांपूर्वी जाधव कुटुंबात एक विवाह होता. त्यावेळी सलग तीन दिवस नवरदेव-नवरीला हळद लावण्यात आली. परंतु, विवाहानंतर अवघ्या पाचव्या दिवशी घरातील सात ते आठ व्यक्तींना ताप, थंडी आणि उलट्यांची लक्षणं जाणवू लागली. काही तासांतच त्या सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात नवरदेवाचाही समावेश होता. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गाव हादरलं आणि त्यानंतर गावाने एकमताने ठरवलं की, हळद फक्त रविवारीच लावायची. ही परंपरा आजही तितक्याच काटेकोरपणे पाळली जाते.
पाल गावाची ही अनोखी परंपरा केवळ श्रद्धेचा भाग नाही, तर एकतेचं, इतिहासाची आठवण ठेवण्याचं आणि संकटांपासून बचाव करण्याचं प्रतीक बनली आहे. बदलत्या काळात अनेक गावांत जुन्या परंपरांचा विसर पडतो, पण पाल गाव मात्र या नियमामुळे वेगळा ठरतो. या खास नियमामुळे गावाची ओळख ‘रविवारची हळद’ असं झाली असून, महाराष्ट्रातील हे एकमेव असे गाव मानले जाते जिथे ही अनोखी रीत आजही जिवंत आहे.
Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz