माउली मंदिराला सुवर्णकळस मिळणार: गोकुळाष्टमीला ऐतिहासिक कलशारोहण
माउली मंदिराला सुवर्णकळस मिळणार: गोकुळाष्टमीला ऐतिहासिक कलशारोहण
आळंदीत संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधी मंदिरावर गोकुळाष्टमीला ११ किलो वजनाचा व ११ कोटी रुपये किमतीचा सुवर्णकळस बसविण्याचा ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सायली मेमाणे
पुणे २९ जुलै २०२५ : संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी मंदिरावर सुवर्णकळस बसविण्याचा ऐतिहासिक निर्णय आळंदी देवस्थान व ग्रामस्थांनी घेतला आहे. माउलींच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आणि त्यांच्याच जन्मदिनी – गोकुळाष्टमीला – हा सुवर्णकळस मंदिराच्या शिखरावर बसवण्यात येणार आहे. सदर सुवर्णकळस सुमारे ११ किलो वजनाचा असून त्याची अंदाजे किंमत ११ कोटी रुपये एवढी आहे. विशेष म्हणजे केवळ पंधरा दिवसांतच सुमारे अडीच कोटी रुपये जमा झाले आहेत.
या उपक्रमामध्ये भाविक, वारकरी, आळंदीकर ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमध्ये माउलींच्या सामर्थ्याचे वर्णन करताना सांगितले आहे की ज्याच्या द्वारी सोन्याचा पिंपळ आहे, त्याला कोणतीही कमतरता कधीच भासत नाही. त्याच प्रेरणेने माउलींच्या मंदिरावर सुवर्णकळस बसवण्याचा संकल्प केला गेला आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुवर्णकळस निर्मितीचे काम सुरू होणार आहे. यासाठी आळंदी देवस्थानच्या प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर लोंढे, अॅड. राजेंद्र उमाप, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील आणि अॅड. रोहिणी पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
हा सुवर्णकळस केवळ धार्मिक श्रद्धेचा भाग नसून, संत परंपरेचा गौरव करणारा आणि वारकरी संप्रदायाच्या निष्ठेचा प्रतीक आहे. यामुळे गोकुळाष्टमीचा दिवस यावर्षी आळंदीत ऐतिहासिक ठरणार आहे.