मुंबईतील व्यावसायिकाला महिला बँक कर्मचाऱ्यावर जबरदस्तीप्रकरणी 1 वर्ष कारावासाची शिक्षा
मुंबईतील व्यावसायिकाला महिला बँक कर्मचाऱ्यावर जबरदस्तीप्रकरणी 1 वर्ष कारावासाची शिक्षा
मालाडमध्ये महिला बँक कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी ५४ वर्षीय व्यावसायिकाला दोषी ठरवत दंडाधिकारी न्यायालयाने 1 वर्षाचा कारावास आणि ₹1000 दंड ठोठावला.
सायली मेमाणे
मुंबई २९ जुलै २०२५ : – मालाड परिसरातील एका धक्कादायक घटनेत ५४ वर्षीय व्यावसायिकाने बँकेकडून आलेल्या महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत एक वर्षाच्या साध्या कारावासाची आणि एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना नोव्हेंबर २०२० मध्ये घडली होती.
घटनेनुसार, आरोपीने बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी अर्ज केला होता. त्याने आधार कार्ड आणि पॅन कार्ड सादर केले, मात्र फोटो नसल्याने बँकेने पत्ता पडताळणीसाठी कर्मचाऱ्याला पाठवले. दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता महिला कर्मचारी त्याच्या घरी पोहोचली, त्यावेळी आरोपी घरी एकटाच होता.
पत्ता पडताळणीचे काम पूर्ण झाल्यानंतर महिला निघण्याच्या तयारीत असताना आरोपीने तिच्यावर मागून झडप घालून तिच्या गालावर आणि मानेवर जबरदस्तीने चुंबन घेतले. इतक्यावरच न थांबता आरोपीने तिच्या संपूर्ण शरीराला स्पर्श करत अश्लील कृत्य केले. महिलेला जबरदस्तीने धरून ठेवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र ती तिथून कसाबसा सुटून पळून गेली आणि तिने थेट बँकेत पोहोचून आपल्या वरिष्ठांना सविस्तर माहिती दिली.
महिलेने मालाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि दोन दिवसांत त्याला जामीनही मिळाला. न्यायालयात खटल्यादरम्यान आरोपीने केलेली कृती पूर्णपणे सिद्ध झाली. महिलेला वारंवार तपासण्यात आले, मात्र तिचे जबाब सुसंगत आणि विश्वासार्ह असल्याचे न्यायालयाने नमूद केले. अशा प्रकारच्या घटनांमध्ये महिलांना घाबरणे साहजिक असल्याचेही नमूद करून उशीराने तक्रार दाखल करण्यावर आक्षेप घेण्यात आला नाही.
या प्रकरणात न्यायालयाने ठाम भूमिका घेत आरोपीच्या अश्लील वर्तनाबद्दल त्याला शिक्षा सुनावली. या निकालामुळे महिला सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा संदेश दिला गेला आहे. ड्युटीवर असणाऱ्या महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होणारच, असा स्पष्ट इशाराही या निकालातून मिळतो.