गणेशोत्सव मंडपासाठी खड्डा खणल्यास ₹15,000 दंड; मुंबई महापालिकेच्या निर्णयाला विरोध

गणेशोत्सव मंडपासाठी खड्डा खणल्यास ₹15,000 दंड; मुंबई महापालिकेच्या निर्णयाला विरोध
मुंबई महापालिकेने गणेशोत्सवासाठी रस्त्यावर खड्डा खणणाऱ्या मंडळांकडून आता प्रति खड्डा ₹15,000 दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचा तीव्र विरोध.
सायली मेमाणे
मुंबई २९ जुलै २०२५ : गणेशोत्सवासाठी मंडप उभारताना रस्त्यावर किंवा पदपथावर खड्डा खणल्यास आता सार्वजनिक मंडळांना महापालिकेकडून प्रति खड्डा तब्बल ₹15,000 दंड भरावा लागणार आहे. याआधी हाच दंड केवळ ₹2,000 होता, मात्र आता सातपट वाढ करून महापालिकेने यावर कठोर भूमिका घेतली आहे. यामुळे अनेक मोठ्या मंडळांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, गणेशोत्सव समन्वय समितीने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
मुंबईत सुमारे 10,000 पेक्षा अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी अनेक मंडळे रस्त्यांवर मंडप उभारतात. महापालिकेच्या परवानगीसह ही मंडळे अनामत रक्कम भरून मंडप उभारतात. परंतु यंदा महापालिकेने खड्डा खणण्यास बंदी घालून, खड्डा आढळल्यास थेट ₹15,000 दंड लावण्याचे परिपत्रक जारी केले आहे.
महापालिकेच्या म्हणण्यानुसार, शहरातील रस्ते काँक्रीटीकरणासाठी 12,000 कोटींचा प्रकल्प राबवला जात आहे. 50% पेक्षा अधिक रस्ते आता काँक्रीट झाले असून, त्यांच्या संरक्षणासाठी कोणतेही खोदकाम निषिद्ध आहे. तसेच पावसाळ्यातील खड्डे बुजवण्यासाठी स्वतंत्र 200 कोटींचे कंत्राट दिले गेले आहे.
या पार्श्वभूमीवर समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी उपस्थित केले की, “मंडळे स्वतः खड्डे बुजवतात तरी त्यांना दंड लावण्यात येतो, मग मुंबईतील इतर खड्ड्यांसाठी कंत्राटदारांवर कारवाई का होत नाही?”
शनिवारी दादर येथे झालेल्या बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या बैठकीत, मंडळांकडून महापालिकेच्या या निर्णयाला जाचक ठरवत दंड रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. मंडळांच्या मते, उत्सवाच्या तयारीला हा निर्णय मोठा अडथळा ठरू शकतो.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter